महापालिकेचे विद्यार्थी वह्या, बुट शालेय साहित्यापासून वंचित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/1-7.jpg)
बुट पुरविणा-या ठेकेदारांची चाैकशी करा – विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आयुक्तांना पत्र
पिंपरी ( महा ई न्यूज) – महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल तीन महिने लोटले तरीही वह्या आणि बुटापासून विद्यार्थी वंचित आहेत. शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी व संबंधित लिपिकाच्या चुकीमुळे ठेकेदाराला पुरवठा आदेश न दिल्यामुळे शालेय साहित्य अद्याप पडून आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व लिपिकांची चाैकशी करुन दोषी आढळणा-यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिक्षण विभागातील वह्या व बूट पुरविणा-या ठेकेदार गेल्या १५ वर्षापासून शालेय साहित्य पुरविण्याचे काम करीत आहे. नातेवाईकांच्या नावांवर वेगवेगळ्या नांवानी ठेका घेत आहे. शालेय सत्र सुरु होऊन आज तीन महिने झाले. परंतु अद्याप पर्यंत काही शाळांना वह्या पुरविल्या गेलेल्या नाहीत.
एका पक्षाच्या नगरसदस्यांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहाराविषयी माहिती मागवली. ती माहिती नगरसेवकाला देवू नये म्हणून संबंधित लिपिकांवर या ठेकेदाराने दबाब आणला. परंतु या दबावाला न घाबरता या प्रकरणाची सर्व माहिती लिपिकाने दिली. त्यामुळे संबंधित त्या लिपिकाची बदली २५ लाख रुपये देऊन केली असल्याचा गंभीर आरोप, एका पक्षाच्या नगरसदस्याने यापूर्वीच केला आहे.
चांगले काम करणा-या लिपिकाची आयुक्त ठेकेदारांच्या सांगण्यानुसार बदली करतात. त्यामुळे प्रशासन ठेकेदार चालवत असल्याचे स्पष्ट होते. तसेच २५ लाख घेतल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याचा अहवाल प्रसिध्द करण्यात यावा. यामध्ये दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, असेही साने यांनी म्हटले आहे.