महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा खाजगी संस्थेला चालवायला देणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/pcmc-5.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
महापालिकेचे काळभोरनगर येथील माध्यमिक विद्यालय खासगी संस्थेला चालवायला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असून आठवी ते दहावीचे वर्ग असतील.
काळभोरनगर येथे इंग्रजी माध्यमाची शाळा आयटीच संस्थेला चालवायला देण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अर्थात एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम असेल. आठवी ते दहावी पर्यंतच्या प्रत्येक वर्गात 35 विद्यार्थी असतील. महापालिकेचे काळभोरनगर विद्यालय आयटीच संस्थेला चालवायला देण्याचा प्रस्ताव 23 जानेवारी 2020 रोजीचा आहे. त्याला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक आहे. ती मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
शाळेच्या वर्ग खोल्या, वीज, पाणीपुरवठा व अन्य भौतिक सुविधा महापालिका पुरविणार आहे. मात्र, शाळेसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांची निवड, कर्मचारी नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, शिक्षणाची पद्धत, रोजचे संचलन, प्रगतीचे मूल्यमापन, देणगीदार निवड व त्यांची जोडणी संस्थेला करावी लागेल.
शिक्षकांचे वेतन, शाळेचा खर्च संस्थेला करावा लागणार आहे. हा खर्च भागविण्यासाठी स्वयंसेवी संस्था किंवा देणगीदाराकडून देणगी घेण्यास मुभा आहे. मात्र, शाळेतील शिक्षण पद्धतीवर महापालिकेचे नियंत्रण असेल. राज्य माध्यमिक बोर्डाची मान्यता व अन्य आवश्यक परवाणग्या घेण्याची जबाबदारी संस्थेची असेल. आयटीच संस्था सध्या पुणे महापालिकेच्या सहा शाळा चालवत आहे.