Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिका शाळांसाठी 50 क्रीडा शिक्षक नेमणार -सभापती तुषार हिंगे
– जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांची घेतली भेट
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या शाळेत क्रीडा शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शाळांसाठी तब्बल 50 क्रीडा शिक्षक नेमण्यात येणार आहेत. तसेच, विद्यार्थी-खेळाडूंना सरावासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलातील साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष तुषार हिंगे यांनी दिली.
या संदर्भात त्यांनी नुकतीच जिल्हाक्रीडाधिकारी विजय संतान यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. हिंगे यांनी सांगितले की, पालिकेच्या अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नाहीत. त्यामुळे त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण दिले जात नाही. परिणामी, शाळेतून खेळाडू घडत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पालिका शाळांसाठी तासिका मानधनावर तब्बल 50 क्रीडा शिक्षक नियुक्त केले जाणार आहे. तसेच, प्रत्येक शाळेत दररोज पी.टी.चा (शारीरिक शिक्षण) तास सक्तीचा केला आहे.
तसेच, शिव छत्रपती क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कामात तेथील सर्व साहित्य बदलण्यात आले आहेत. नवीन तंत्रज्ञानानुसार अद्ययावत साहित्य घेतले जात आहे. संकुलातील पुर्नवापरायोग्य उच्च दर्जाचे साहित्य महापालिकेच्या क्रीडा विभागास मिळाल्यास त्याचा पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंना लाभ होईल. त्यामुळे तेथील साहित्य महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावे, अशी मागणी हिंगे यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी विजयसंतान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापालिका क्रीडा विभागाच्या या प्रोत्साहनात्मक गोष्टींचे त्यांनी स्वागत केले आहे.