महापालिका वाहनांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींची निविदा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/महापालिका-1.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज) – महापालिकेच्या वाहनदुरुस्तीवर सातत्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च व वाढीव निधी दिला जातो. महापालिकेच्या अ गटातील वाहनांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी सुमारे दीड कोटी खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यशाळा विभागामार्फत विविध वाहनांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. दुरुस्तीसाठी पालिकेच्या विविध विभागांकडील कार्यरत वाहनांचे गट तयार करण्यात आले आहेत. या गटवार पद्धतीने ठेकेदारांकडून वाहनांची दुरुस्ती केली जाते. अव्वाच्या सव्वा खर्च व वाढीव खर्चामुळे वाहनांची दुरुस्ती व कार्यशाळा विभाग सातत्याने चर्चेत येतो. दरम्यान, जुन्या वाहनांमुळे अधिक खर्च होत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
दरम्यान, कार्यशाळा विभागाने ‘अ’ गटातील वाहनांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढली आहे. सन २०१८ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी अ गटातील वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदारी संस्था नेमण्याचे हे काम सुरू आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मे. युवराज मोटर्स या ठेकेदारी संस्थेने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. तीन वर्षांसाठी या ठेकेदाराला तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी (दि. २९) होणाऱ्या बैठकीपुढे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.