महापालिका कामगार कल्याण मंडळाला जागा देणार, कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191221-WA0022.jpg)
- भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
आण्णासाहेब मगर स्टेडियमची जागा कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची असून ती मंडळाला मिळावी यासाठी गेल्या 27 वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. 20) पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत भारती चव्हाण व इतर कामगार प्रतिनिधींची बैठक आयुक्तांच्या कक्षात झाली. यावेळी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती आज शनिवारी (दि. 21) भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबैठकीस महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, कामगार नेते व नगरसेवक माऊली थोरात, नामदेव ढाके, केशव घोळवे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक कल्याण आयुक्त समाधान भोसले, कामगार कल्याण निरीक्षक संजय सुर्वे, कामगार प्रतिनिधी तानाजी एकोंडे (थरम्ँक्स), राजेश हजारे (टाटा मोटर्स), गोरखनाथ वाघमारे (महेंद्र ही.आय.), स्वानंद पाठक( एस.के.एफ), श्रीकांत जोगदंड (डायनोमार्क), भरत शिंदे ( टाटा मोटर्स) आदी उपस्थित होते.
या बैठकीत आयुक्त हर्डीकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली. कामगार कल्याण मंडळाच्या नेहरूनगर येथील 27 एकर जागेत अण्णासाहेब मगर स्टेडियम व विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या 27 एकर जागेच्या बदल्यात महापालिकेने कामगार कल्याण मंडळास रोख एक कोटी रुपये व शहरात पर्यायी सहा एकर जागा उपलब्ध करून द्यावी, असा करार 27 वर्षापूर्वी करण्यात आला होता. कराराची अंमलबजावणी व पूर्तता न करता महापालिकेने बेकायदेशीररीत्या कामगार कल्याण मंडळाला विश्वासात न घेता त्यांचा हक्क डावलून अण्णासाहेब मगर स्टेडियम पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. मनपा प्रशासनाची ही भूमिका पूर्णत: बेकायदेशीर आहे. ही निविदा प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अन्यथा आगामी 15 दिवसात तीव्र आंदोलन करू व याबाबत न्यायालयात दावा दाखल करू असे, असा इशारा भारती चव्हाण यांनी दिला होता.
- कामगार कल्याण मंडळाला ही जागा मिळणार
शुक्रवारी (दि. 20) झालेल्या बैठकीत मनपा प्रशासनाने कामगार कल्याण मंडळाला पुढे नमूद केल्याप्रमाणे जागा देण्याचे प्राथमिक स्तरावर मान्य केले आहे. त्या जागा पुढीलप्रमाणे : आकुर्डी येथील ऐश्वर्यम सोसायटीशेजारी एक एकर, मोरवाडी लालटोपीनगर येथे 24 गुंठे, संभाजीनगर बर्ड व्हॅली शेजारी 26 गुंठे, मोशी बो-हाडेवस्ती येथे 53 गुंठे, वाकड येथे 7 गुंठे, चिखली जाधववाडी येथे गायरानमधील 2 एकर जागा देण्याचे प्रस्तावित आहे. तर, दळवीनगर चिंचवड येथील 20 गुंठे जागा व रोख एक कोटी रुपये यापूर्वी मिळाले आहेत. वरीलप्रमाणे 6 एकर जागा कामगार कल्याण मंडळास सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्वरीत हस्तांतरण झाल्यास कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणार्थ विविध सामाजिक विकास प्रकल्प उभारण्याचे कामगार कल्याण मंडळाचे नियोजन आहे.