महादेव मंदिर दुर्घटनेस जबाबदार अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190221-WA0035.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे गुरव येथील महादेव मंदिर बांधकामाला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही महापालिका अधिका-यांनी त्यावर कारवाई केली नाही. याचा खुलासा अधिका-यांनी करावा. संबंधित अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
यासंदर्भात साने यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथील महादेव मंदिराचे बांधकाम कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या मंदिराचे बांधकाम अनधिकृतपणे सुरू होते. हे अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस 16 नोव्हेंबर 2018 रोजी दिली होती. नोटीस बजावून देखील हे बांधकाम सुरूच होते. त्याला पालिकेचा बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग जबाबदार आहे. केवळ राजकीय दबावापोटी या विभागाने मंदिराच्या बांधकामावर कारवाी केली नाही.
मंदिराच्या बांधकामाला केवळ नोटीस बजावून पालिका अधिकारी शांत का बसले? गोरगरिबांचे पत्राशेड देखील नोटीस देऊन पाडले जाते. मग, या बांधकामाला अधिका-यांनी का समर्थन दिले?. याचा खुलासा संबंधित विभागातील अधिका-यांनी करावा. या विभागातील संबंधित अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी साने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.