‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ खासगी रुग्णालयात उपलब्ध करावी – मा. खासदार गजानन बाबर
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
Covid-19 साथरोग प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना, सर्व खाजगी व शासन मान्यता प्राप्त रुग्णालयातर्फे मिळावा. या योजनेच्या लाभाची मुदतवाढ साथीचा प्रादुर्भाव असेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात माजी खासदार बाबर यांनी मंत्री टोपे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यामध्ये 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारित महात्मा फुले जन आरोग्य योजनेची पंतप्रधान जन आरोग्य योजना सलंगणीकरण करून एकत्रित स्वरूपात मे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने 1 एप्रिल 2020 पासून अमलात आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केली जाते. परंतु, वरील योजनेचा लाभ राज्यातील 80 ते 85 टक्के नागरिकांना होत असल्याने उर्वरित नागरिक वंचित राहत आहेत. तसेच, कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी 23 मे 2020 रोजी परिपत्रक डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी काढून राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत मान्यताप्राप्त दराने उपचार करण्याची सुविधा प्राप्त करून दिली, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
परंतु, आज वस्तुस्थिती बघितली तर मे महिना व जुलै महिना यामध्ये रुग्ण वाढीच्या संख्येत खूप फरक आहे, आज जर आपण फक्त पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला तर पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखापर्यंत पोचली आहे. आपण अंगीकृत केलेल्या रुग्णालयांचा विचार केला तर यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील covid-19 साठी खाजगी रुग्णालयांपैकी एकॉर्ड हॉस्पिटल मोशी, देसाई एक्सीडेंट हॉस्पिटल भोसरी, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, ओम हॉस्पिटल भोसरी, डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी, शासन मान्यताप्राप्त रुग्णालयांपैकी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी यांचा सामावेश होतो.
परंतु, यापैकी दोन हॉस्पिटलमध्ये अजून covid-19 सुविधा सुरू झालेली नाही. असे आरोग्य विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. वास्तविक पाहता या रुग्णालयांचा विचार केला तर सहापैकी चार रुग्णालयात एकूण बेडची संख्या जवळपास 2200 बेडची संख्या, 198 आय सी यू बेड, वेंटिलेटर 73 असून ही संख्या अपुरी आहे. वास्तविक पाहता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर आपण पिंपरी चिंचवडची वस्तुस्थिती बघितली तर आत्तापर्यंत 9000 कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत. तसेच, सध्याच्या परिस्थितीत जवळपास 2500 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास 500 च्या आसपास आढळत असून आत्तापर्यंत मृत्यूंची संख्या 200 वर गेली आहे. परिस्थिती खूप आटोक्याबाहेर जात असून यासाठी ठोस उपाययोजना तसेच कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालय सर्व खुली करण्यात येण्याची गरज आहे.
आपली महात्मा फुले जन आरोग्य योजना या सर्व खासगी रुग्णालयात ही मान्यताप्राप्त दराने उपलब्ध करून देण्याची शासनाने सोय करावी, जेणेकरून सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळेल तसेच सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये शासनमान्य आपला एक जनसंपर्क अधिकारी ठेवावा, जेणेकरून कोणताही त्रास रुग्णाच्या घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना होणार नाही, अशी मागणी बाबर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.