मसापच्या पिंपरी चिंचवडला उत्कृष्ट शाखा पुरस्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/1-217.jpg)
पिंपरी – महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणेच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातून साहित्य क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या शाखेला तसेच कथा, काव्य, कादंबरी अशा साहित्य विभागातील उत्कृष्ट साहित्यिकांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यावर्षी हा पुरस्कार विविधांगी साहित्यिक उपक्रमातून साहित्यिक चळवळ राबविणाऱ्या पिंपरी चिंचवड शाखेला देण्यात येणार आहे. राजा फडणीस पुरस्कृत या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. 27) मसाप पुणेच्या वर्धापन दिन समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती व ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलन, कवी संमेलन, कथा व गझल लेखन कार्यशाळा, ललित लेखन कार्यशाळा, परिसंवाद तसेच नाट्य अभिवाचन, नामांकित साहित्यिकांचा जीवन प्रवास परिचय, कवितांची संगीतमय गाणी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दिल्लीपर्यंत केलेली सह्यांची मोहिम व महाराष्ट्र भवन येथे केलेले शांततामय आंदोलन, मराठी प्राध्यापकांची बैठक व चर्चासत्र यांचे आयोजन, राज्यस्तरीय कथा काव्य स्पर्धेचे आयोजन, विशेष कार्य करण्याऱ्या मराठी प्राध्यापकांचा सन्मान, महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या महिलांचा सन्मान, कुसुमाग्रज दिन, महाराष्ट्र दिन, ज्येष्ठांसाठी विनोदी कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमातून साहित्यिक चळवळ तळागाळात राबविण्यासाठी पिंपरी चिंचवड शाखा प्रयत्नशील असल्याने या शाखेची निवड करण्यात आली असल्याची माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाखेच्या कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे व उपाध्यक्षा रजनी शेठ यांचे नियोजन, कार्यवाह संजय जगताप व दीपक अमोलिक यांचे संयोजन तसेच इतर सर्व कार्यकारीणी सदस्यांचे आयोजन आणि सभासदांचा सक्रिय सहभाग यामुळे शाखेला ही भरीव कामगिरी करता आली, असे शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी सांगितले.