मराठा आरक्षण ; उद्या पिंपरी चिंचवड शहर बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/2Maratha_Kranti_Morcha_6-1.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उद्या (गुरुवारी)मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड सकल मराठा समाजाच्या वतीने शहरवासियांना गुरुवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबडेकर चाैकात दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलकांनी तोडफोड, जाळपोळ करु नये. आंदोलन बदनाम होईल, असे कोणतेही कृत्य करु नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी महापालिकेच्या पत्रकार कक्षेत झालेल्या पत्रकार परिषदेला मारुती भापकर, प्रकाश जाधव, धनाजी येळकर आदी उपस्थित होते. भापकर यांनी सांगितले की, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लहान मोठे व्यापारी, उद्योजक, शाळा, महाविद्यालये यासह विविध क्षेत्रातील सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या बंद मधून वैद्यकीय सेवांसह इतर आपतकालीन सेवांना वगळण्यात आले आहे.