मराठवाडा जनविकास संघाची यंदाची दिवाळी निराधार, दिव्यांग, सफाई कामगारांसोबत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201102-WA0007.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साध्या पद्धतीने परंतु सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विभिन्न घटकांसोबत साजरी करण्याचे ठरविले आहे. समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ”अधी कष्टकरी वर्गाची दिवाळी, नंतर आपली” या भूमिकेतून निराधार मुले- मुली, दिव्यांग व्यक्ती, सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, औषध फवारणी करणारे कामगार आदींना पोशाख व मिठाई वाटप करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने ‘स्नेहछाया निराधार बालगृह’ दिघी येथील विद्यार्थी – विद्यार्थीनी, ‘दिव्यांग प्रतिष्ठान’ चिंचवड येथील दिव्यांग व्यक्ती, पिंपळे गुरव ‘पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी व पोस्टमन, पिंपरी ‘पोस्ट ऑफिस’ मधील पोस्टमन-कर्मचारी, पिंपरी- चिंचवडसह भोसरी भागातील महिला व पुरुष सफाई कामगार, घंटागाडी कामगार, औषध फवारणी करणारे कामगार, महापालिकेचे महिला कामगार यांना फराळ आणि साडी चोळी, तसेच पुरुष कामगार वर्गाला पुर्ण पोशाख व मिठाई देऊन दिवाळी आधीच साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आला होता. यावेळी लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप विक्रम महाराज जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विकास संघ दिघीचे संस्थापक अध्यक्ष सुभेदार मेजर (निवृत्त), अशोकराव काशीद, दिघीकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. उत्तम घुगे, सांगवी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोळुंके, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अलका जोशी, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या निर्मला गायकवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, सामाजिक कार्यकर्ते कुलदिप परांडे, सूर्यकांत कुरुलकर, बळीराम माळी, अनिस पठाण, प्रकाश इंगोले, संतोष पाटील, रमेश जाधव, हभप राजु मोरे, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले. तर, दत्तात्रय धोंडगे यांनी आभार मानले.