भ्रष्टाचारी अनाजी पंतांना हत्तीच्या पायी द्यायला हवं – खासदार डाॅ. अमोल कोल्हे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/IMG_2296.jpg)
- स्थानिक प्रश्नांसह केंद्राच्या योजनाचा घेतला आढावा
- कचरा, पाणी, रेडझोन, आरोग्य प्रश्नांवर आयुक्तांना धरले धारेवर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात कच-यासह अनेक प्रश्न लोकांना भेडसावत आहेत. महापालिकेच्या अनेक योजनांमध्ये ठेकेदारांना पोसले जात आहे. तर केंद्रासह राज्याच्या अनेक योजनांमधील प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे लोकांमधील भ्रष्टाचारी अनाजी पंतांना हत्ती पायी द्यायला हवं, असे मत खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसदर्भात शिरुरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी आज (गुरुवार) आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना कचरा, पाणी टंचाई, रेडझोन सोयी-सुविधा बंद करणे, आरोग्य या प्रश्नांवर धारेवर धरले. यासह केंद्र व राज्याच्या विविध योजनाबाबत सध्यस्थिती घेवून सविस्तर माहिती देण्याच्या सुचना केल्या. या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डिकर, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेविका मंगला कदम, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. कोल्हे म्हणाले की, शहराच्या कचरा प्रश्नांवर आयुक्तांना समाधानकारण उत्तर देता आले नाही. त्यांनी कच-यांची निविदा ठेकेदारांना पोसण्यासाठी काढली आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती मागितली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचा एसव्हीपी स्थापनेनंतर सल्लागार पुन्हा घेण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसने जनतेची भूमिका सभागृहात मांडल्याने भोसरी रुग्णालय खासगीकरण थांबले आहे. जनतेसाठी ते खुलं होवून आरोग्य सुविधा चांगल्या देण्यात याव्यात, अशा सुचना केल्या आहेत. स्वाईन फ्लू, कच-यामुळे रोगराई पसरु नये, याबाबत योग्य ती दक्षता घेण्याचे सांगितले आहे. रेडझोन असलेल्या भागात सोयी सुविधा बंद होणार नाहीत. त्यात नव्याने होणा-या बांधकामांना सोयी-सुविधा देणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प नमामि चंद्रभागा प्रकल्पात समाविष्ट केल्याचे समजले आहे. त्या प्रकल्पांची सविस्तर माहिती घेवून नदी सुधार प्रकल्पांची प्रयत्न करण्यात येईल, तसेच इंद्रायणी नदीतील जलप्रदुषणामुळे आळंदी पिण्याचे प्रदुषित झाले आहे. त्या नदीतील मासे हे मृत पावत आहेत. नदी सुधार प्रकल्प राबविणे काळाची गरज असून नद्या स्वच्छ करणे आवश्यक आहेत, असेही कोल्हे यांनी सांगितले.