भोसरी गावठाणातून 30 किलो गांजा जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/ganja-smuggling_20180698098.jpeg)
पिंपरी – गस्तीदरम्यान अडविलेल्या मोटारीतून पोलिसांनी तीस किलो गांजा जप्त केला. ही कारवाई भोसरी गावठाण येथील शंकर मंदीराजवळ शुक्रवारी भोसरी पोलिसांनी केली असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
उत्तरेश्वर उर्फ बॉक्सर दगडू कांबळे (वय ५४, रा. गुळवे वस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसरी गावठाण येथील शंकर मंदीरामागील स्माशानभुमी रोड येथे दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी (एमएच १२, एल जे १९०५) ही मोटार संशयास्पदरित्या आढळून आली. ही मोटार थांबवून कांबळे याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये ३० किलो ४३५ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्यानंतर उत्तरेश्वर कांबळे याच्यासह चंदन राठोड (वय ५५, रा. बिदर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक शंकर अवताडे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक महेंद्र गाढवे, कर्मचारी गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमीत देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, आशिष गोपी, सागर भोसले, बाळासाहेब विधाते यांच्या पथकाने केली.