‘भारत बंद’ ; मनसेने जुना पुणे – मुंबई महामार्ग रोखला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/IMG-20180910-WA0008.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने बंदला पाठिंबा दिलेला नाही. तर मनसेने मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे. हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान, पिंपरी पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्षांसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना मोहननगर पोलिस चाैकीस आणून बसवून ठेवले आहे.
या पक्षांचा पाठिंबा
‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
‘भारत बंद’मुळे गणेशोत्सवानिमित्त घोषित केलेल्या एसटीच्या विशेष बसगाडय़ा सोमवारी सकाळऐवजी दुपारी ३ नंतर सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.