भारतीय हवाई दल भरतीसाठी होणा-या मनपाच्या खर्चावर आक्षेप – दत्ता साने
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/datta-sane.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – भारतीय हवाई दलाची भरती भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह व भोसरी गावजत्रा मैदानात 21 ते 29 जुलैदरम्यान होणार आहे. भरतीच्या नियोजनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सुमारे 50 लाख 2 हजार 244 रुपये खर्च करणार आहे. त्यावर महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला आहे. खर्चाच्या रक्कमेची भारतीय हवाई दलाने मागणी केली होती का?, भरतीचे श्रेय लाटण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी शहरात फ्लेक्सबाजी करण्याचे कारण काय?, असा प्रश्न साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारला आहे.
भारतीय हवाई दलाची भरती प्रक्रिया होणे याबाबत आक्षेप मुळीच नाही. हा देशहिताचा विषय आहे. तरुणांना नोक-या मिळण्यासाठी भरती विधायक मार्ग आहे. त्यासाठी महापालिका खर्च करत असेल तर काहीच हरकत नाही. परंतु, मनपा खर्च करत असताना या कार्यक्रमाची प्रसिध्दी मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे घेत आहेत. हे आक्षेपार्ह आहे. विशेष म्हणजे हवाई दलाकडून भरती प्रक्रियेसाठी खर्चाची मागणी महापालिकेकडे केली होती का?, तसे नसेल तर पालिका हा खर्च कोणाच्या सांगण्यावरून करत आहे?. भरती प्रक्रियेत महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनचा सहभाग कोणत्या आधारावर करण्यात आला आहे?.
जर, भरती कार्यक्रमावर मनपा खर्च करत असेल तर भरती संदर्भातील आमदार लांडगे यांच्या जाहिरातबाजीवर मनपा खर्च करत आहे का?, नेमकी किती रक्कम खर्च करण्यात आली? असे प्रश्न साने यांनी उपस्थित केले आहेत. मनपाच्या इतिहासात अशा कार्यक्रमांवर मनपाने आर्थिक खर्च केलेला नाही. या कार्यक्रमाच्या खर्चाची बिले अदा करण्यात येऊ नयेत. बिल अदा केल्यास संबंधित अधिका-याच्या मासिक वेतनातून वजा करण्यात यावेत, अशी तंबी साने यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिली आहे.