breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप पक्षसंघटन वाढीसाठी ‘दिलजमाई’, शहराध्यक्ष तथा आमदार लांडगेशी ‘चाय पे चर्चा’

राज्यासह शहरात पक्षवाढीवर काम करणार; प्रदेश पातळीवर मोठी जबाबदारी निश्चित

पिंपरी |महाईन्यूज| विकास शिंदे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अचानक तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ करुन दिलखुलास गप्पा मारल्या. यापुढे शहरात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यासह ‘एकसाथ’ काम करण्याची तयारी दोघांनी दाखविली आहे. त्यामुळे अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय उठलेल्या वावड्यांना पुर्णविराम मिळणार आहे. दरम्यान, प्रदेश पातळीवर पवार यांना मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेतही मिळू लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरावर राष्ट्रवादी काॅंग्रेसची सलग पंधरा वर्ष एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादी काॅंग्रेसला टक्कर देण्यासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भाजपचे काही चेहरे कायम शह देत राहिले. त्या काळात भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ पवार, सदाशिव खाडे, स्वर्गीय अकुंशराव लांडगे, अमर साबळे यांच्यासह अन्य काही चेह-यांनी पक्ष टिकवून ठेवत ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले. त्यामुळेच शहरात भाजप वाढून पक्ष जिवंत ठेवण्याचे कार्य जून्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केले.

केंद्रासह राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पक्षवाढीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. तत्पुर्वी महानगरपालिकेत भाजपचे केवळ तीन नगरसेवक होते. 2014 मध्ये राज्यात भाजप सत्ता येताच चिंचवड विधानसभेच्या रुपाने आमदार लक्ष्मण जगताप हे निवडून आले. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष पदी जगताप यांचीच वर्णी लागली. तर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे हे देखील भाजपचे सहयोग सदस्य झाले. त्यामुळे जून्या-नव्याची सांगड घातल्यामुळे फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता उलथवून टाकत भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली.

भाजपची महापालिकेवर सत्ता येताच चिंचवड आणि भोसरीच्या आमदारांनी सत्तेची सुत्रे आपआपल्या ताब्यात ठेवली. त्यांनी महापाैर, स्थायी समितीसह विषय समित्या, प्रभागावर आपल्या समर्थकांना संधी दिली. त्यात पक्षाने एकमेवच सभागृह नेतेपदी एकनाथ पवार यांची वर्णी लावली. गेल्या तीन वर्षाच्या काळात सत्तारुढ पक्षनेत्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेता आला नाही. त्यांना सतत सत्ताधारी आमदारांच्या आदेशाची वाट पाहावी लागत होती. पालिकेतील निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करता आला नाही. त्यामुळे पद-प्रतिष्ठा असूनही कारभा-यांपुढे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा’ लागत होता. पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नाहीत, प्रभागात विकास कामांना अडथळा येतोय, प्रत्येक कामासाठी कारभा-यांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय कामेच होत नव्हती. यामुळे मागील काळात पक्षाच्या नगरसेवकांची प्रचंड नाराजी ओढावली आहे.

अशा परिस्थितीत महापालिकेच्या कामकाजात काम करणे कठीण बनले होते. त्यात विरोधकांच्या टिकेला सतत प्रत्युत्तर देण्याचे एकमेव काम सभागृह नेत्यांकडे राहिले होते. त्यामुळे ‘वनवासाला आम्ही, फळे खायाला तुम्ही’ अशी स्थिती निर्माण झाल्याने सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला. त्याच्या राजीनाम्यामुळे शहर भाजपात विशेषता जून्या निष्ठावंत गटात एकच खळबळ उडाली. तर राजीनाम्याचा सगळा रोख भोसरी व चिंचवडच्या कारभा-यांकडे गेल्याने वेगवेगळ्या राजकीय वावड्या उठायला सुरुवात झाली.

दरम्यान, सभागृहनेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आज (मंगळवार) त्यांनी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. तब्बल दोन तास वेगवेगळ्या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. तसेच यापुढील काळात एकत्रितपणे, पक्ष संघटन मजबूत करण्यासह पक्षाचे विचार, ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचे निश्चित केले. तसेच पक्ष जी जबाबदारी, काम देईल, ते काम कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे पुर्ण करण्याचेही पवार यांनी ठरविले आहे. याशिवाय सभागृहनेते पवार आणि शहराध्यक्ष लांडगे यांनी एकत्रित काम करण्याचा शब्द एकमेकांना दिला आहे. या दोघांच्या ‘दिलजमाई’ने निश्चितच भाजपला पुन्हा पक्षवाढीला फायदा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button