भंडा-याच्या गसरगुंडीमुळे नागरिक जायबंदी; महापौरांनी हात जोडून मागितली माफी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pcmc-mayor-rahul-jadhav-1.jpg)
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक राहूल जाधव यांना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महापौरपदी संधी दिल्याबद्दल सखल माळी समाजबांधवांनी पालिका आवारात 100 पोती भंडा-याची उधळण करून जल्लोष केला. दरम्यान, पाऊस पडल्याने पालिकेच्या आवारात पिवळा चिखल झाला. जाधव यांच्या निवडीचा जल्लोष करणारे त्यांचे समर्थक अक्षरषः गसरून पडले. प्रशासकीय कामकाजासाठी पालिकेत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांनासुध्दा गरसगुंडीचा चांगलाच प्रसाद मिळाला. याबाबत जाधव यांनी मात्र, आज माध्यमांसमोर हात जोडून माफी मागितली.
पालिका मुख्यालयात महापौर-उपमहापौरपदाची शनिवारी (दि. 4) निवडणूक होती. आमदार महेश लांडगे यांचे समर्थक राहुल जाधव यांच्या निवडीवर सभागृहात शिक्कामोर्तब झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. सुरुवातीला ढोल ताशांचा दणदणाट सुरू होता. त्यानंतर, भंडारा उधळण्यास सुरुवात झाली. प्रारंभी ५० पोती आणण्यात आली व ती कमी पडल्याचे सांगत आणखी पोती मागवण्यात आली. भंडारा उधळण्यासाठी कार्यकर्ते गाडय़ांच्या टपावर उभे राहिले होते. काही वेळानंतर जेसीबी आणण्यात आला होता. त्यावर बसून कार्यकर्ते भंडाऱ्याची उधळण करत होते. पालिकेत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर भंडारा टाकला होता. मुख्यालयात लावलेल्या चारचाकी व दुचाकी पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाल्या. थोडय़ावेळात पाऊस आला. त्यानंतर, सर्वत्र पिवळा चिखल तयार झाला. त्यावरून जाणारी दुचाकी वाहने घसरुन काहींना इजाही झाली. पाण्याचे फवारे मारून रस्ते स्वच्छ करावे लागले. भोसरी पट्टय़ातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उन्मादाचे वळण लागल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.
याबाबत जाधव म्हणाले की, मला महापौरपद मिळाल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यानी जो जल्लोष केला. त्यांनी जास्त भंडारा उधळला. आमचे ग्रामदैवत खंडोबा असल्याने भंड-याला जास्त मान दिला जातो. यात्रेला देखील भंडाऱ्याचा वापर केला जातो. संघर्षातून आल्यानंतर जे यश मिळते, तो आनंद वेगळाच असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. आजपर्यंत सर्वांनी भंडारा गुलाल उधळलेला आहे. परंतु, भंडारा उधळल्यानंतर थोडासा पाऊस आला आणि त्याठिकाणी वाहने घसरले, नागरिक पडले असतील. ज्यांना दुखापत झाली, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त केली आहे. पावसामुळे शहरवासीयांना जो त्रास सोसावा लागला. त्याबद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. पुढील काळात अशा घटना घडणार नाहीत, असे त्यांनी माध्यमांसमोर म्हटले आहे.