बोगस एफडीआर प्रकरण; ‘त्या’ ठेकेदारावर फाैजदारीचे आदेश
![बोगस एफडीआर प्रकरण; 'त्या' ठेकेदारावर फाैजदारीचे आदेश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-1-2.jpg)
आयुक्त श्रावण हर्डिकर यांचे शहर अभियंता राजन पाटील यांना निर्देश
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बोगस एफडीआर आणि बॅंक गॅंरटी घोटाळ्यातील ठेकेदारांना स्थायी समितीने ऐनवेळी ठराव करुन सभापतींनी पाठबळ दिले होते. मात्र, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्या सर्व 18 ठेकेदारावर फाैजदारी दाखल करावी, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले.
महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील यांना निर्देश देताना आयुक्तांनी फाैजदारी गुन्हे दाखल करायला एवढा वेळ कसा लागला? यांचे स्पष्टीकरण मागितले आहे. महापालिकेच्या स्थापत्यसह अन्य विभागातील 75 टक्केपेक्षा जास्त काम झालेल्या ठेकेदारांकडून काम पुर्ण करण्यात येईल. परंतू, त्यापेक्षा कमी काम झालेले सर्व कामाचे आदेश रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीने ऐनवेळी केलेल्या ठरावाला आयुक्तांनी केराची टोपली दाखविली आहे.
तसेच स्थापत्यसह विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठा, पर्यावरण, जलनिःसारण विभागाकडून अद्यापही एफडीआर आणि बॅंक गॅंरटी प्रकरणाची तपासणी सुरु आहे. मात्र, खोटी एफडीआर आणि बॅंक गॅंरटी दिलेल्या ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकण्याची प्रशासनाने केलेली कारवाई कायम ठेवण्यात येणार आहे.