बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकांची फसवणूक, भोसरीत गुन्हा दाखल
![Rs 25 lakh under the pretext of insurance policy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/fraud-2-4.jpg)
भोसरी ( महा ई न्यूज ) – फ्लॅट खरेदी करण्यासाठी एका ग्राहकाने बांधकाम व्यावसायिकाला ७ लाख ५३ हजार ४३४ रुपये दिले. पैसे देऊन अडीच वर्ष उलटले मात्र बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटचा ताबा त्या ग्राहकाला दिला नाही. तसेच भरलेले पैसे देखील परत केले नाहीत. ही घटना नोव्हेंबर २०१६ ते १ ऑगस्ट २०१९ या कालावधीत वडमुखवाडी येथे घडली.
याप्रकरणी ग्राहक राजेश मधुकरराव कामठेकर (वय ४०, रा. भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश लोंढे या बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरॅकल नाईन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीची वडमुखवाडी येथे बांधकाम साईट सुरु आहे. राजेश याने कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बांधकाम साईटमध्ये ८०० चौरस फुटांचा एक फ्लॅट बुक केला. त्यापोटी राजेश यांनी महेश लोंढे याला नोव्हेंबर २०१६ पासून ७ लाख ५३ हजार ४३४ रुपये दिले. पैसे घेऊन दिलेल्या मुदतीत महेश याने राजेश यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. वेळेत फ्लॅट न मिळाल्याने राजेश यांनी भरलेले पैसे परत मागितले. पैसे देण्यासाठी महेश याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत राजेश यांनी पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस तपास करत आहेत.