प्राथमिक शाळेच्या आरक्षणावर अतिक्रमण ; महापालिकेचे होतेय दुर्लक्ष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/3Encroachment_15.jpg)
पिंपरी – महापालिकेच्या विविध आरक्षणांवर अतिक्रमणाचा धंदा सध्या तेजीत आहे. दिघी येथील सर्व्हे क्रमांक ७८/२ मधील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जागेवर गेल्या महिनाभरात दुकाने आणि घरांचे अतिक्रमण झाले आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत नाथा रेंगडे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. याबाबत रेंगडे म्हणाले, ‘‘दिघीच्या गजानन महाराजनगर येथील सुमारे ४० गुंठे जागेवर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक २/११६ हे, प्राथमिक शाळेसाठी आहे. गेल्या महिनाभरात एका व्यक्तीने त्या जागेवर कब्जा करुन दुकाने आणि घरे बांधली. पालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार केली. महापालिकेतच्या सार्वजिनक जागांवर बांधकामे करत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.’’
दरम्यान, महापालिकेच्या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या तसेच सध्या उद्यान असलेल्या जागांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे सुरूच आहेत. दिघीच्या गायरान जागेवर काही लोकांनी दहा-वीस गुंठे जागा बळकावली आणि सात मंदिरांचे बांधकाम केले. राजकीय दबावामुळे कारवाई कारवाई होत नाही, असे समजले. पालिकेचे स्थापत्य प्रवक्ते आबा ढवळे म्हणाले, ‘‘या सर्व बांधकामांना नोटीस दिली आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’’