प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडीत घुमणार 9,500 विद्यार्थ्यांचा आवाज

- राष्ट्रभक्तीपर समुहगीतांचे होणार गायन
- मनपा शाळेचे 200 विद्यार्थी करणार संचलन
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या शनिवारी (दि. 26) राष्ट्रभक्तीपर समुहगीतांचे गायन होणार आहे. मनपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील 9 हजार 750 विद्यार्थी सामुहीक गीत गायन करणार आहे. त्यामुळे निगडीत उद्या राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे.
शिक्षण विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मनपाच्या शाळेतील एकूण 9 हजार 750 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यांना निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर येण्यासाठी व कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी 109 पीएमपीएमएल बसेसची व्यवस्था केली आहे. एका बसमध्ये 50 विद्यार्थ्यांप्रमाणे क्रिडा शिक्षक, पर्यवेक्षक, शिक्षक या सर्वांसाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे. उद्या सकाळी सात वाजता बसेस शाळेत येणार आहेत. सर्व विद्यार्थी उपस्थित राहिल्यानंतर 10 वाजता समुहगीत गायनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. यामध्ये चार समुहगीतांचे गायन होणार आहे. तसेच, 200 विद्यार्थी संचलन देखील करणार आहेत. संचलनासाठी त्यांना बुट आणि सॉक्सचे जोड देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना अल्पोपहारासाठी 6 राजगीरा लाडू, एनर्जी ड्रींक, पाण्याची बाटली, गुडडेचा विस्कीट पुडा देण्यात येणार आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सकाळी आठ वाजता ध्वजवंदन होणार आहे. साडेनऊ वाजता याठिकाणी देखील समुहगीतांचा कार्यक्रम होणार आहे. याठिकाणी निगडी परिसरातील शाळेतील सुमारे 1 हजार 500 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी भक्ती-शक्ती चौकात पोहोचण्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली नाही. त्यांना शाळेतील ध्वजवंदन झाल्यानंतर याठिकाणी पायी चालत यावे लागणार आहे.





