पोलीस ठाण्यातच महिला पोलिसांना धक्काबुक्की
![Tadipar goons come to the border and push the police ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/police-fir.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकाला मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना चिंचवड पोलीस ठाणे येथे सोमवारी (दि. 19) दुपारी घडली.
सौम्या लालबिहारी यादव (वय 21) आणि सुशांत मेश्राम (दोघेही रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महिला पोलीस कर्मचारी शुभांगी राजेंद्र बाविस्कर यांनी सोमवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चिंचवड पोलीस ठाण्यात एक तक्रारदार तक्रार देण्यासाठी आले होते.
त्यावेळी आरोपी सौम्या आणि सुशांत पोलीस ठाण्यात आले. पोलिसांसमोरच त्यांनी तक्रारदार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी महिला पोलिसांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली.