पोलिस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार ; पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/1-1.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज) – पिंंपरी – चिंचवड शहर स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथून सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिस आयुक्तालय चिंचवड प्रेमलोक पार्कच्या इमारतीचे काम पुर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (दि.3) झालेल्या बैठकीत दिली.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीस भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आदी उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिकेतील त्यांच्या कार्यालयात पत्रकारांना ही माहिती दिली.
पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी सुरू केले जाणार आहे. त्यासाठी चिंचवडच्या ऑटो क्लस्टरमध्ये पोलिस आयुक्त व अतिरिक्त पोलिस आयुक्ताचे तात्पुरते कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथून शहराचे सर्व कामकाज सुरू राहणार आहेत. या पोलीस आयुक्तालयाकडे एकूण 15 पोलिस ठाण्याअंतर्गत 2 हजार 200 पोलिस कर्मचार्यांचा ताबा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच, 3 टप्प्यात 2 हजार 700 पोलिस कर्मचारी मिळणार आहेत. प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे सुशोभिकरण व फर्निचरचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या इमारतीतून पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.