पैशासाठी कच-यात दगड-माती कालवणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
![# Covid-19: Pimpri-Chinchwad Corporation establishes field surveillance team at municipal level…; That should be the task of the field surveillance team!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/pcmc-1-6.jpg)
- महापौर उषा उर्फ माई ढोरे यांची सूचना
- आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले निविदेन
पिंपरी / महाईन्यूज
कच-याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती, दगड-धोंडे, राडारोडा मिश्रित करून बिलापोटी पालिकेचे लाखो रुपये लाटणा-या ए. जी. एन्व्हायरो इन्फ्रो प्रोजेक्ट्स या ठेकेदाराचा असली चेहरा समोर आला आहे. या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ए. जी. एन्व्हायरो इन्फ्रो प्रोजेक्ट्स या संस्थेला शहरातील घनकचरा संकलनाचे कंत्राट दिले आहे. शहरातील कचरा संकलन करून त्याची मोशी येथील कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम ठेकादाराचे आहे. घनकच-याचे वजन करून त्यांना बिले दिली जातात. जेवढे अधीक वजन तेवढे अधीक बिल पालिकेकडून दिले जाते. वाढीव बिले लाटण्यासाठी या ठेकेदाराकडून काळा उद्योग केला जात असल्याचे उघड झाले आहे. वजन वाढविण्यासाठी वाकड येथील कस्पटे वस्ती याठिकाणी कच-यामध्ये चक्क माती, दगड-धोंडे आणि राडारोडा मिसळत असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे या ठेकेदाराची पाचावर धारण बसली आहे.
नियमांचे उल्लंघन करून कच-यात दगड-धोंडे, राडारोडा, माती मिसळून संबंधीत ठेकेदाराने वाढीव बिले वसूल केल्याचा संशय महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ए. जी. एन्व्हायरो इन्फ्रो प्रोजेक्ट्स या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला कायमचे काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी सूचना महापौर ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.