पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू, आमदार जगतापांच्या मागणीला यश
पिंपरी / महाईन्यूज
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागणीनंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार जगताप यांनी राज्य सरकारच्या चालू वर्षातील दुस-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 18 सप्टेंबर 2020 च्या पत्रान्वये सूचना मांडली होती. त्याची दखल घेऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याला मंजुरी दिली.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सोयीस्कर व्हावे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधीत कामकाज करण्यासाठी आलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा. त्यासाठीच्या कागदपत्रांची पुर्तता करणे, अर्ज दाखल करणे, माहिती घेणे सोपे जावे यासाठी आमदार जगताप यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची सूचना 18 सप्टेंबर 2020 च्या पत्रान्वये राज्य सरकारच्या 2020 च्या दुस-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती.
नागरिकांच्या हिताचा विषय समोर आल्याने महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जगतापांच्या मागणीला मंजुरी दिली. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. त्याची रितसर पोच राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून आमदार जगतापांना प्राप्त झाली आहे.