पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हाॅटेल्स, बार 31 मार्चपर्यंत राहणार बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/13-7.jpg)
पुण्यामध्ये सुमारे दोन हजार, तर पिंपरी- चिंचवडमध्ये एक हजार हॉटेल्स आणि बार
पुणे |महाईन्यूज|
शहरातील बाजारपेठ बंद करण्याच्या निर्णयापाठोपाठ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील हॉटेल्स आणि बार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (दि.१८) दिले.
शहरातील कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाने तीन दिवसांचा बंद यापूर्वीच जाहीर केला आहे. शहरातील सुमारे 40 हजार दुकानदार, व्यावसायिक त्यात सहभागी झाले आहेत. हॉटेल संघटनांनीही हॉटेल आणि बार बंद करण्याचे आवाहन संबंधित व्यावसायिकांना केले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे, की परमीट रूम, बार, पब रेस्टॉरंट परवाने असलेल्यांनी 18 ते 31 मार्चपर्यंत व्यवसाय बंद ठेवावेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार पोलिसांनाही देण्यात आले आहेत. शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये सुमारे तीन हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आणि बार आहेत.
कोरोनासाठी खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्वांचीच असताना, त्यातून तारांकित हॉटेल्सना वगळण्याचे कारण काय, असा प्रश्न पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी आणि सचिव किशोर सरपोतदार यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कायदा सर्वांसाठी सारखा असताना त्यात भेदभाव कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न सरपोतदार यांनी उपस्थित केला आहे. पुण्यामध्ये सुमारे दोन हजार, तर पिंपरी- चिंचवडमध्ये एक हजार हॉटेल्स आणि बार आहेत.