पुजा चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
![Puja Chavan Kesachi CBI Chowkashi Kara](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/rokade.jpg)
– वंचित बहुजन महिला आघाडीच्या लता रोकडे यांची मागणी
– केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, अप्पर तहसिलदार यांना दिले निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
वानवडी, पुणे येथे मुळच्या बीड जिल्ह्यातील एका 23 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ही आत्महत्या नसुन घातपात असल्याचे प्रत्यक्षदर्शी बाहेर आलेल्या काही पुराव्यांवरून दिसुन येत आहे. सदर घटनेत महाविकास आघाडी सरकारमधील काही बड्या नेत्यांचा सहभाग असल्याची ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. महाविकास आघाडीमधील बडे नेते या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने करण्यात आली.
या बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र दिले आहे. तर अप्पर तहसिलदारांना प्रत्यक्ष भेटुन निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा लता रोकडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या वेळी महासचिव सुधा रायन, गौरी शेलार, उपाध्यक्षा निर्मला कांबळे, कोषाध्यक्षा शारदा बनसोडे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
निवेदनात नमुद करण्यात आले की, सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्या संबंधी ठोस निर्णय घ्यावा. महाविकास आघाडी सरकार मधील ज्या पक्षाच्या त्या नेत्या विरोधात ती ऑडिओ क्लिप प्रसारित झाली आहे, त्यांची प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत जबाबदारी मुक्त करावे. या प्रकरणात जे गुन्हेगार आहेत. त्याच्यावर कडक कारवाई करावी. तसेच या प्रकरणात दबाव टाकणाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी या वेळी लता रोकडे यांनी केली.