‘पीएमपीएमएल’च्या संचलन तुटीचा मंजूर विषय स्थगित ठेवा – महापाैरांचे स्थायी सभापतींना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/94e884df2b516c06d46faa9cf86a2307.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पीएमपीएमएलचे अधिकारी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिका-यांना सन्मानपुर्वक वागणूक देत नाहीत. त्यांच्या पत्राला उत्तरे देत नाहीत. त्यामुळे स्थायी समितीने संचलन तूटीपोटी ‘पीएमपीएमएल’ला 15 कोटी, 84 लाख 85 हजार 851 रुपये देण्याचा मंजूर केलेला विषय स्थगित ठेवा, असे पत्र महापौर राहुल जाधव यांनी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांना दिले.
याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पीसीएमटी आणि पीएमटी यांचे सन 2007 मध्ये एकीकरण होऊन पीएमपीएमपीएलची स्थापना झाली. या कंपनीचा कारभार चालवण्यासाठी पुणे महापालिका 60% व पिंपरी-चिंचवड महापालिका 40 % रक्कम अदा करण्याचे ठरले. त्यानुसार सन 2007 पासून पिंपरी महापालिकेने पीएमपीएमएलला ठरल्याप्रमाणे 40 टक्के हिश्याची रक्कम नियमितपणे अदा केली आहे. तरीही, पीएमपीएम मधील कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये महापालिकेच्या पदाधिका-यांना विश्वासात घेतले जात नाही.
पूर्व पीसीएमटीच्या कर्मचा-यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जात असल्याचे दिसून येते. पीएमपीची सेवा नागरिकांना व्यवस्थितपणे भेटत नाही. शहरासाठी बसची संख्या अपुरी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमी जुन्या प्रकारच्या बस आढळून येतात. वेळेवर बस येत नसल्याने नागरिकांना कायम त्रासाला सामोरे जावे लागते. संचालक मंडळाची बैठक ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केल्या जात नाहीत. पीएमपीएमएल कंपनीचे अधिकारी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नाही. त्यांनी दिलेल्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे स्थायी समितीने मंगळवारी (दि.12)पुणे महानगर परिवहन महामंडळ यांना संचलन तुटीची रक्कम देण्याचा मंजूर केलेला विषय तूर्त स्थगित ठेवण्यात यावा, अशी सूचना महापौर जाधव यांनी केली आहे.