पिंपळे गुरवमध्ये पाणीपुरवठा विभागाकडून विद्युत पंप जप्तीची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1pimple_gurav.jpg)
पिंपरी – महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून पिंपळे गुरवमध्ये आज (गुरुवारी) विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या. नागरिकांनी महापालिकेच्या नळ जोडणीला थेट विद्युत पंप लावल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
मोरया पार्क येथील नागरिकांच्या अनेक दिवसांपासून अपुऱ्या पाण्याच्या संदर्भात स्थानिक नगरसेवक व ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम यांच्याकडे तक्रारी येत होत्या. त्यासंदर्भात कदम यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसमवेत तेथील नागरिकांची भेट घेतली असता काही लोक नळजोडणीला थेट विद्युत पंप लाऊन अनाधिकृत पाण्याचा उपसा करीत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. त्याप्रमाणे आज कनिष्ठ अभियंता अमित दीक्षित यांनी पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता रामदास तांबे, उपअभियंता सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क करून मोरया पार्क येथून दहा विद्युत पंप जप्त केले.
ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम म्हणाले, ” नागरिकांनी विद्युत पंप थेट नळ जोडणीला न करता पाण्याची टाकी तयार करून त्यात पाणी जमा करावे. व तेथून विद्युत पंपाद्वारे वरच्या मजल्यावर उपसा करावा. जेणेकरून सर्वांनाच पाण्याचा समसमान फायदा होईल. भविष्यातही महापालिकेकडून अशा कारवाई चालु राहतील. त्यामुळे नागरिकांनी दंड व मनस्ताप टाळण्यासाठी जमिनीलगत टाकी तयार करून घ्यावी. ”