पिंपरी मतदार संघात राष्ट्रवादीचे शेखर ओव्हाळ यांचे जोरदार ब्रँडींग
- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू
- फ्लेक्सबाजी व उपक्रमांतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
पिंपरी, (महाईन्यूज) – लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांनाच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यातच पिंपरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी जोरदार ब्रँडींग केले आहे. वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदार संघात शुभेच्छांचे फ्लेक्स लावून मतदारांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी न खचता विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विविध विधानसभा मतदार संघातील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी विधानसभेवर दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी दिसते. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी उपक्रमांचे आयोजन केले आहे. 2 जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी पिंपरी मतदार संघात फ्लेक्स लावून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेखर ओव्हाळ हे समाविष्ठ गावातील नगरसेवक राहिले आहेत. मध्यंतरी राजकीय स्थित्यंतरे बदलल्यामुळे त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. परंतु, काही कालावधीनंतर ते पुन्हा आपल्या पूर्वभूमिकेवर ठाम राहिले आहेत. राष्ट्रवादीचे एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.