पिंपरी चिंचवड शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
![Launch of Pulse Polio Vaccination Campaign in Pimpri Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/polio.jpg)
पिंपरी |प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील ५ वर्षाखालील बालकांना प्रतिबंधक लस पाजण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते महापालिकेच्या सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी प्रसूतीगृह येथे बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आला.
शहर पोलिओ मुक्त करण्यासाठी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करून पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या पोलिओ बूथ केंद्रावर नेऊन पोलिओ डोस पाजून घ्यावा, पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शुभारंभ प्रसंगी ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोरकुमार हांडे, डॉ. सुप्रिया बिरादार, डॉ. श्रद्धा कोकरे, डॉ. तुषार जाधव, डॉ. अल्वी नासीर, डॉ. कुंदन पाटील, डॉ. गोविंदा नरके, पब्लिक हेल्थ नर्स अंजली नेवसे, सिस्टर इन्चार्ज स्नेहल करमरकर आदी उपस्थित होते.
महापालिकेने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. शहरात १०१९ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि ५५ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २१५ पर्यवेक्षक तसेच ३०४२ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
महापालिकेची सर्व रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा ९०८ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे असणार आहेत. तर बस स्थानक आणि रेल्वे स्थानक अशा ठिकाणी ३८ ट्रांझीट लसीकरण केंद्रे आणि वीटभट्टया, फिरत्या लोकांची पाले याठ ठिकाणच्या बालकांसाठी ७३ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. या ठिकाणी पालकांनी आपल्या ५ वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे असे महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या.
कोरोना विषाणू संक्रमण काळात वैद्यकीय कर्मचा-यांनी चांगले काम केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यात ब-यापैकी यशस्वी झालो तरी अजून पूर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही महापौर माई ढोरे यांनी सांगितले.