breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तपदावर कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती

पिंपरी | प्रतिनिधी

शहराचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांना आयर्नमॅन म्हणूनही ओळखले जाते. ते सध्या महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 45 अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशावर आज, बुधवारी स्वाक्षरी केली आहे. पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांचीही बदली करण्यात आली नाही. या बदल्यांची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.

पिंपरी चिंचवडचे मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई हे पिंपरी चिंचवड शहराचे दुसरे पोलीस आयुक्त होते. आयुक्तालयाचे पहिले आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागी बिष्णोई यांची 20 सप्टेंबर 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली होती.

पद्मनाभन ऑक्टोबर 2019 मध्ये निवृत्त होत असल्याने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करत बिष्णोई यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहराची धुरा सोपविण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरात येण्यापूर्वी संदीप बिष्णोई वैधमापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियंत्रक म्हणून कार्यरत होते.

पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ज्यांना के पी आयर्नमॅन म्हणून ओळखले जाते. ते झारखंड मधील हजारीबाग येथील आहेत. 1998 च्या बॅचचे आयपीएस कॅडेट आहेत. सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यासाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्ण प्रकाश यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.

‘रेस्ट ॲक्रॉस वेस्ट अमेरिका’ या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. 1 हजार 500 किलोमीटर अंतर सायकलिंगची स्पर्धा असून हिचा मार्ग पश्चिम अमेरिकेच्या चार राज्यातून जाणारा असतो. या मार्गावर काही ठिकाणी अति उष्ण तर काही ठिकाणी अतिशय थंड प्रदेश लागतो. या स्पर्धेसाठी 92 तासांचा वेळ असतो. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा 88 तासात पूर्ण करून स्पर्धेत यश मिळवले. तसेच सायकलिंगमध्येही नवीन रेकॉर्ड बनवला.

ऑगस्ट 2017 मध्ये फ्रांस मध्ये ‘आयर्नमॅन ट्रायलथॉन’ ही स्पर्धा झाली. 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकल चालवणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा देखील 14 तास 8 मिनिटात पूर्ण करून वयाच्या 42 व्या वर्षी आयर्नमॅनचा किताब मिळवला आहे.

सतत हसतमुख आणि आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात तसेच शहरात पोलिसांचा वचक निर्माण करण्यास ते यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button