breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये विधान परिषदेची ‘दंगल’; खेळणार आता योगेश बहल!

माजी महापौर योगेश बहल राष्ट्रवादीकडून प्रमुख दावेदार

माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरेंसह इच्छुकांमध्ये स्पर्धा

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता ‘कात’ टाकण्याच्या तयारीत आहे. माजी महापौर योगेश बहल यांनी विधान परिषद निवडणुकीच्या स्पर्धेत उडी घेतली असून, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ‘फिल्डिंग’  लावली आहे. यापूर्वीच माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते विलास लांडे तसेच विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी तीव्र इच्छुक असल्याचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या या ‘दंगल’ मध्ये योगेश बहल कशी बाजी मारतील काय? अशी चर्चा शहर राष्ट्रवादीमध्ये सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘गुडबॉक्स’ मध्ये असलेले माजी महापौर योगेश बहल यांनी तब्बल २९ वर्षे महापालिका सभागृहात पक्षाचे नेतृत्व केले आहे. पक्षाला पराभवाच्या खाईत सोडून अनेकांनी सोयीचे राजकारण केले. मात्र, बहल यांनी अजित पवार यांची साथ सोडली नाही.

योगेश बहल अत्यंत अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. त्यातच महापालिकेली स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, महापौर अशी महत्त्वाची पदे भुषवल्यानंतर शहर संघटनेची कमान शहराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे सांभाण्याचा अनुभवही बहल यांच्या खात्यात आहे. इंग्रजीवर उत्तम पकड असलेल्या बहल यांनी महापालिका सभागृह जसे गाजवले आहे. तसेच, अजित पवार यांचा विश्वासही संपादन केला आहे. पण, स्थानिक आणि बाहेरचा यासह ‘जाती’ वरुन अनेकदा प्रस्थापित नेत्यांकडून ‘लक्ष्य’ झालेले  योगेश बहल राजकीय क्षमता असतानाही आमदार-खासदार होवू शकले नाही.

मावळ लोकसभेची होती ‘ऑफर’…पण,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती असलेल्या योगेश बहल यांना २०१४ मध्ये मावळ लोकसभा निवडणूक लढवण्याची ‘ऑफर’ दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली होती. मात्र, ‘जात’ आडवी आली आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी द्यावी लागली. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडच्या विकासात योगेश बहल यांचे योगदान नाकारता येणार नाही.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्य स्थितीतील धोरण पाहता ‘बाहुबळ’ पेक्षा बौद्धिक आणि वैचारिक पातळीवर पक्षाला हितकारक ठरणाऱ्या नवीन चेहऱ्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा कल दिसतो. दुसरीकडे, योगेश बहल  स्पर्धेत आल्यामुळे माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह इच्छुकांची डोकेदुखी वाढणार आहे.

आजी-माजी ७० नगरसेवकांचा पाठिंबा…

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागा पिंपरी-चिंचवड शहराला मिळावी. त्यामध्ये योगेश बहल यांच्या नावाचा विचार करावा, अशा आशयाची शिफारस पिंपरी-चिंचवडमधील आजी- माजी सुमारे ७० नगरसेवकांनी योगेश बहल यांच्या शिफारस पत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या ‘दंगल’ मध्ये या घडीला तरी योगेश बहल यांचे पारडे जड दिसत आहे.  विशेष म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगेश बहल यांना आमदारपदी संधी देण्यात यावी. त्यामुळे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराचा अभ्यासपूर्ण पर्दाफाश करण्यास मदत होईल. शहरात भाजपच्या दोन आमदारांना टक्कर देण्यासाठी आमदार आण्णा बनसोडे आणि योगेश बहल यांची मोठी मदत होईल, असा एक मतप्रवाह शहर राष्ट्रवादीमध्ये तयार झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button