पिंपरी चिंचवडमध्ये कोविड रुग्णांची आर्थिक पिळवणूक; प्राथमिक तपासणीत पाच रुग्णालयास ‘शो’काॅज नोटीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-Corona-virus.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|विकास शिंदे
पिंपरी चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात कोविड-19 रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरातील बड्या पाच खासगी रुग्णालय व्यवस्थापनास नोटीस बजावली असून त्याच्या खुलासा अहवालानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील काही ‘कोविड-19’ ही खासगी रुग्णालये रुग्णांच्या आर्थिक शोषणाची केंद्रे झाली आहेत. एकेका रुग्णांकडून दोन, अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंतची बिले वसूल करण्याचा धडका त्यानी लावला आहे. हे आर्थिक शोषण थांबविणार कोण, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करु लागले होते. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढू लागल्याने राज्य शासनाने प्रत्येक रुग्णांच्या बिलांचे आॅडीट करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानूसार पिंपरी महापालिकेत खासगी रुग्णांलयाच्या बिलांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. त्यानूसार शहरातील खासगी रुग्णालयाच्या बिलांची तपासणी सुरु आहे.
दरम्यान, महापालिकेच्या लेखा विभागातील अधिका-यांनी थेरगावचे आदित्य बिर्ला मेमोरियल हाॅस्पीटल, पिंपरीचे डी.वाय.पाटील हाॅस्पीटल, सिटी केअर सेंटर हाॅस्पीटल, आकुर्डीचे स्टार मल्टीस्पेशालिस्ट हाॅस्पीटल यासह अन्य काही रुग्णालयाची कसून तपासणी केलेली असून यातील पाच बड्या हाॅस्पीटलला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.
एका दिवसांत 5 ‘इंजेक्शन’
पिंपरी चिंचवडमधील एका ‘कोविड हेल्थ सेंटर’मध्ये (डीसीएसी) एका दिवसांमध्ये 5 ‘रेमडेसीविर’चे ) बिल लावले आहे. एका इंजेक्शनची किंमत 5 हजार 400 रुपये आहे. एका दिवसात एका रुग्णासाठी पाच इंजेक्शन वापरल्याचा दावा रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.
शहरातील ‘बड्या’ रुग्णालयांत जास्त बिल
पिंपरी चिंचवड शहरातील आॅक्सीजनबेड, व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये जादा बिले आकारल्याचे प्राथमिक तपासणी उघड झाले आहे. त्यातील एका मोठ्या रुग्णालयातील 3 दिवसांचे बिल पाच लाख रुपये होते. त्या रुग्णाला कोरोनामुक्त झाल्याने दोन लाख रुपयाची सूट देण्यात आली. त्यामुळे सदरील रुग्णाने तीन लाख रुपये बिल तत्काळ भरले. या बिलांमध्ये त्या रुग्णांकडून सर्वाधिक बिल आकारुन त्याला सूट देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
रुग्णालयाचा परवाना होवू शकतो रद्द?
पिंपरी चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात कोविड-19 रुग्णांच्या बिलांची तपासणी आयकर विभागाचे आयएएस अधिकारी अशोक बाबू यांच्या नियंत्रणाखाली तपासणी करण्यात येत आहे. त्यानूसार जादा बिले आकारलेल्या शहरातील बड्या पाच रुग्णालयास त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून रुग्णालय व्यवस्थापनाचा खुलासा मागविला आहे. त्याचा असमाधानकारक खुलासा आल्यास त्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई अथवा रुग्णालयाचा महापालिका परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांच्याकडे ठेवण्यात येणार आहे.
सरकारने निश्चित केलेले दिवसाचे दर
4000 आयसोलेशन वॉर्ड
7500 अतिदक्षता विभाग
9000 व्हेंटिलेटर लावल्यास औषधांचा खर्च
रुग्णाला नियमित औषधे घेण्याव्यतिरिक्त कोणतीही औषधे डॉक्टरांनी दिलेली नसतात; पण तरीही औषधांचे हजारो रुपयांचे बिल हेल्थ सेंटरमधून रुग्णाच्या नातेवाइकांना भरावे लागत आहे.