पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पोलिसांची कोविड 19 ‘टेस्ट’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/WhatsApp-Image-2020-11-30-at-15.33.00-2-300x230-1.jpeg)
पिंपरी / महाईन्यूज
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व वाहतूक पोलिसांची कोविड -१९ चाचणी करण्यात आली. मोशीतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी या विधायक उपक्रमाचे आयोजन केले होते.
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास सुरुवात झाली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलिसांचा या विषाणूने बळी घेतला. वाहतूक सुरुळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा संपर्क वाहनचालकांशी येतो. यामध्ये कोरोनाबाधित असेल तर त्याचा धोका सर्वाधिक पोलिस बांधवांना होतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून, सिल्वर ग्रुपचे संचालक संतोष बारणे यांनी कोविड -१९ चाचणीचे शिबिर आयोजित केले होते.
या शिबिरास पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक पोलिसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजित शिबिरामध्ये कोविड तपासणी केलेल्या सर्व वाहतूक पोलिसांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने बारणे यांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वीही उद्योजक बारणे यांनी नागरिकांसाठी, पोलिसांसाठी आणि आता वाहतूक पोलिसांसाठी शिबिर यशस्वीरित्या घेतले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आमदार महेशदादा लांडगे यांनी केले आहे.