breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडची धुरा आता पार्थ पवार यांच्या खांद्यावर! अजित पवार यांची ‘त्या’ बैठकीला अनुपस्थिती!

–       शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याची दाट शक्यता

–       पक्षाध्यक्ष शरद पवार नवीन चेह-यांना संधी देण्याच्या मनस्थितीत

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला ‘तळहातावरील फोडा’प्रमाणे जपले. राज्यातील विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनवले. मात्र, महापालिका आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला दारुन पराभवाचा सामना करावा लागला. एकेकाळी अजित पवार यांचा ‘बालेकिल्ला’ असलेल्या शहराला दादांच्याच चेल्यांनी सुरूंग लावला. राजकारणात कधीही हार न मानणारे अजित पवार लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलाचा पराभावाने मात्र हतबल झाले.  ज्या शहरातील विकासकामांसाठी सकाळी सात वाजता पिंपरी-चिंचवडच्या फूटपाथवर हजर राहणारे अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पदाधिका-यांच्या बैठकीला अनुपस्थित राहीले नाहीत, हे या शहरातील नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्यायाने अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील अनेकांना नगरसेवक, चेअरमन, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदार बनवले. तरीही गेल्या महापालिका, लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागला. मावळ लोकसभा निवडणुकीत तर चिंचवड विधानसभा मतदार संघात पक्ष एक लाखाच्या घरांत पिछाडीवर राहिला. पिंपरी विधानसभेत सुमारे ४० हजार मतांनी पिछाडी पहावी लागली. सत्तेच्या काळात पक्षीय मर्यादा विसरुन अनेकांना आम्ही मदत केली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीत पक्षासह अन्य पक्षांतील पदाधिकारी-नेतेही पार्थला मदत करतील, असा भाबडा आत्मविश्वास अजित पवार यांना होता. मात्र, चित्र उलटे झाले.

अजित पवार यांच्या आत्मविश्वासाला लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तडा गेला. पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांबाबत भाजपकडे सांगायला एकही उल्लेखनीय विकासकाम नाही. निवडणुकीच्या अगदी काहीदिवस अगोदरपर्यंत भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये विस्तवसुद्धा जात नव्‍हता. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील परिस्थिती भाजपच्या काळात खुप बदलली आहे, असेही नाही. मात्र, लोकसभा निवडणुका या देश पातळीवरील नेतृत्व लक्षात घेवून होतात. मतदारांनी भाजपच्या बाजुने कौल दिला. हा पराभव अजित पवार यांच्या जिव्‍हारी लागला आहे. ज्या शहरासाठी आपण दिवसरात्र मेहनत घेतली. ज्या शहरातील स्थानिकांना महापालिका प्रशासनानतील सर्व लाभाची पदे बहाल केली. राजकीय ताकद दिली. त्याच शहरातील नेते आज राष्ट्रवादीपेक्षा ‘मोठे’ झालेले अजित पवारांना पहावी लागले. अजित पवारांचा पराभव त्यांच्याच पठ्ठ्यांनी केला.

पिंपरी-चिंचवडमधून पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य मिळेल, अशी अटगळ बांधली जात होती. मात्र, तसे झाले नाही. चिंचवडमध्ये आणि पिंपरीमध्ये पक्षाला मानहानीकारक पिछाडी पहावी लागली. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकारली. दुसरीकडे, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. या सर्व राजकीय उलथापालथीवर अजित पवार यांनी आजवर ‘ब्र’ अक्षरही काढले नाही.

****

अजित पवारांची अनुपस्थिती ही बदलाची चाहुल…

काळात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भोसरीत बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहीले नाहीत. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघात शरद पवार यांनीही बैठक घेण्याचे टाळले. त्यानंतर मुंबईला आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी शरद  पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्यासह युवा नेते पार्थ पवार हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीला मावळमधील पराभवाची कारणमिमांसा करण्यात करण्यात आली. स्थानिक पदाधिकारी, नेत्यांची मते जाणून घेण्यात आली. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील बारीक-सारिक गोष्टीकडे आपुलकीने लक्ष घालणारे अजित पवार या बैठकीला उपस्थित राहीले नाहीत. त्याअगोदर पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिका-यांच्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांनी ‘ती’ अनुपस्थिती याच गोष्टीचे संकेत आहेत की, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा आता पार्थ पवार यांच्याकडे सोपवली जाईल. विशेष म्हणजे, पार्थ पवार यांच्या साथीला नव्या दमाच्या दुस-या फळीतील कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत ताकद दिली जाईल. याबाबत शरद पवार यांनी जाहीरपणे दुजोरा दिला आहे. वास्तविक, हेच पक्षाच्या हिताचे ठरणार आहे, असा अंदाज राजकीय जाणकारांमधून बांधला जात आहे.

****

नकारात्मक प्रचारामुळे पार्थ पवारांना फटका…

शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यापेक्षा निश्चित राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार जोरात होता. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकांची मोठी फौज होती. मात्र, त्यामध्ये एकवाक्यता कुठेही दिसली नाही. पक्षाच्या दुस-या फळीतील ‘चौकडी’ने पार्थ पवार यांची अक्षरश: नाकेबंदी केली होती. पार्थनी कुठे जावे…कुठे नाही…कुठे थांबावे…संपूर्ण प्रचार यंत्रणा अतिउत्साही लोकांनी ‘हायजॅक’ केली. त्याहुन गांभीर्याची बाब म्हणजे… पक्षातील काही महाभागांनी केलेला नकारात्मक प्रचार… एकवेळ प्रचार केला नाही तरी फरक पडला नसता. मात्र, नकारात्मक प्रचारामुळे पार्थ आणि राष्ट्रवादीबाबतची ‘निगेटिव्‍हीटी’ आणखी वाढली. कारण, काही लोकांनी …अरे आम्हाला काम करावे लागले…मालकाचा पोरं आहे… आतापर्यंत अजितदादांचे ऐकावे लागले…यापुढे पार्थ पवारांचे ऐकूण घ्यावेच लागेल आम्हाला…बाबा… महापालिका निवडणूक लढवायची आहे. त्यावेळी तिकीटासाठी त्यांच्याच दारात जावे लागेल… दादांसाठी काम करावे लागेल… दादांनी पार्थला बोलायला शिकवायला हवे होते… ही वाक्ये निट ऐकली तर अनेकांच्या तोंडात दिसत होती. समोरचा व्यक्तीसमोर प्रचार किंवा चर्चा करताना त्यांचा नकारात्मक प्रभाव निर्माण होत होता. त्याला पद्धतशीर फोडणी मिळाली स्थानिक आणि बाहेरचा अशा वादाची. त्यामुळे पिंपरी आणि चिंचवडमधील पिछाडीमुळे पार्थ यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button