पिंपरी कॅम्पातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवा – खासदार श्रीरंग बारणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/8-9.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी कॅम्पात वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. कॅम्पात रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. कॅम्पातील वाहतूक कोंडी सुरळित करण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस, महापालिका अधिका-यांना दिल्या आहेत. पिंपरीतील डायचीच्या प्लॉटची लेवल करुन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. महापालिकेचे वाहनतळाचे आरक्षण तातडीने विकसित करावे, असे निर्देशही बारणे यांनी दिले आहेत.
पिंपरी कॅम्पमधील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावित. त्यातून मार्ग काढण्याची विनंती पिंपरी व्यापारी असोसिएशनने खासदार बारणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार बारणे यांनी आज (बुधवारी) सकाळी वाहतूक पोलीस, आरटीओचे अधिकारी आणि महापालिका अधिका-यांसमवेत पिंपरी कॅम्पमधील वाहतूक समस्येची पाहणी केली. वाहतूक विभागाच्या सहाय्यक आयुक्त निलिमा जाधव, पिंपरीचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, आरटीओचे निरीक्षक पांढरे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, पिंपरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिवादास पमनानी, महेश मोटवानी, दिपक मेवानी, किशोर केसवाने, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, रोमी संधू आदी उपस्थित होते.
पिंपरी कॅम्प शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. कॅम्पमध्ये वाहने पार्क करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्क केली जातात. भाटनगर ते साई चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. राधिका चौकात रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन जाता येत नाही.
अतिक्रमण, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मार्केटमध्ये जाण्याचा येण्याचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे महापालिकेने तातडीने पार्किंगची व्यवस्था करावी. रस्त्यावरील अतिक्रमाणांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत. पथकाची नियुक्ती करावी. वाहतुकीची दररोज देखरेख करण्यात यावी. जय हिंद हायस्कूलजवळ शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. तिथे वार्डन अथवा विशेष पोलिसाची नियुक्ती करावी. नागरिकांना नाहक त्रास होणार नाही. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.
पिंपरीतील डायचीचा प्लॉट पार्किंगसाठी ठेवला आहे. त्या प्लॉटमध्ये झाडेझुडपे झाली आहेत. त्या प्लॉटची लेवल करुन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. महापालिकेचे वाहनतळाचे आरक्षण तातडीने विकसित करावे, असे निर्देशही बारणे यांनी दिले आहेत. पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष पथक स्थापन केले जाणार आहे. पिंपरी कॅम्पात वाहतूक कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी तैनात ठेवण्यात येईल असे अधिका-यांनी सांगितले असल्याची माहितीही बारणे यांनी दिली.