पिंपरीत खड्ड्यात पडून मृत्यू पावलेल्या तरुणींच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई द्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/23316777_368144850294915_1047952982795123967_n-1.jpg)
- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांची मागणी
पिंपरी – मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांत अपघात होऊन एका दिवसात पाच जणांना जीव गमवावा लागला. या खड्यांची जबाबदारी राज्य सरकारची नसून मुंबई महापालिकेची आहे, असे वक्तव्य करुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जबाबदारी झटकून मुंबई महापालिकेला दोषी ठरविले. अशाच पध्दतीने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्ड्यांत अपघात होऊन दुचाकीवरून जाणा-या तरुणीचा हकनाक बळी गेला. या तरुणीच्या मत्यूची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील का, असा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील खड्डयांच्या बळींची जबाबदारी मुंबई महापालिकेची तर तोच न्याय पिंपरी चिंचवडमधील खड्डयांच्या बाबतीत लागू व्हायला हवा. पिंपरी महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या खड्डयांत अपघात होऊन मृत्यूमुखी पावलेल्या कुटूंबियांना पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी. मुंबईतील खड्डयांमुळे अपघातात मृत्यू पावलेल्यांची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे दिली. मग राज्यातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटूंबियांची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांनी घ्यावी. तसेच पिंपरी चिंचवडमधील खड्डयांमध्ये अपघात होऊन मृत्यू झालेल्या तरुणीच्या कुटूंबियांना शहरातील सत्ताधारी भाजपने नुकसान भरपाई द्यावी. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसात व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे पंधरादिवसात बुजवावेत. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तीव्र आंदोलन करील अशा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्त्यांवर खड्डे दाखवा व लाखांची बक्षिसे मिळवा अशा पोकळ घोषणा करुन जाहीरातबाजी केली. त्यांना प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह राष्ट्रवादीच्या हजारों पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खड्ड्याचे सेल्फी चंद्रकांत पाटलांना पाठवून दिले होते. तेंव्हा त्यांनी खड्यांची जबाबदारी स्विकारली नाही. आता मुंबईतील खड्डयांमुळे पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांची जबाबदारी मुंबई महापालिकेची. तोच न्याय चंद्रकांत पाटलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लावावा व खड्डयांमुळे ज्या तरुणीचा मृत्यू झाला त्याची जबाबदारीही शहरातील भाजपा सत्ताधा–यांनी घ्यावी व महापालिका आणि संबंधित विभागाच्या अभियंत्यांच्या पगारातून पैसे वसूल करुन नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी वाकडकर यांनी केली आहे.