पिंपरीतील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत ‘ब्रिटीश ग्रंथालय’! पाच कोटींची तरतूद?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/DSC_6950-copy.jpg)
- स्मारक समितीची महापौरांसोबत झाली बैठक
- बैठकीत महापौरांनी घेतले महत्वाचे निर्णय
पिंपरी, (महाईन्यूज) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकात 5 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. पिंपरीतील स्मारकात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्यात येणार आहे. ब्रिटीश ग्रंथालयाच्या धर्तीवर ‘युपीएससी’ आणि ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे. येत्या पाच महिन्यांत या कामाची स्वतंत्र निविदा काढून कामाचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी दिली.
- पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरीतील महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्याच्या मागील जागेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका केंद्र उभारण्यासाठी भव्य इमारत बांधली आहे. परंतु, अभ्यासिकेचा उद्देश बाजुला राहून या इमारतीमध्ये महापालिकेतील विविध विभागांचे प्रशासकीय कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे स्मारक समितीच्या मागण्यांना हरताळ फासला गेला आहे. परंतु, समितीने मागण्यांसाठी महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासनाचा पाठपुरावा सोडला नाही. आज महापौर राहूल जाधव यांच्यासोबत स्मारक समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीने प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची सूचना केली.
स्मारक इमारतीमधील पालिकेच्या प्रशासकीय विभागातील कामकाजाच्या फाईली अस्थाव्यस्त ठेवल्या आहेत. त्या काढून घेण्याची मागणी समितीने केली. या इमारतीमध्ये ब्रिटीश धर्तीवर अभ्यासिका सुरू करण्यात यावी. त्यामध्ये युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल. इमारतीमध्ये महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलघडणारा ऐतिहासिक क्षण अधोरिखीत करावा. सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा बांधावा. त्यामुळे हे स्मारक देशातील पर्यटन स्थळापैकी एक होण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, अशा मागण्या स्मारक समितीच्या समन्वयकांनी महापौरांच्या समोर मांडल्या.
- त्यावर महापौर म्हणाले की, या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकात 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद पुरेशी नसल्यामुळे यात वाढ करणे अपेक्षीत आहे. त्यात वर्गीकरण करून ही तरतूद 5 कोटी रुपये करण्यात येणार आहे. ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी पाच महिन्यांत निविदा काढल्या जातील. सल्लागार नेमून प्रत्यक्ष कामाचे आदेश ठेकेदाराला दिले जातील, असे आश्वासन महापौर राहूल जाधव यांनी स्मारक समितीच्या समन्वयकांना दिले.