पिंपरीतील माजी नगरसेवकाच्या मुलाचा प्रताप; पाच तोळे सोने घेवून ‘सैराट’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/1-24.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
मराठी चित्रपट ‘सैराट ’फेम आकाश ठोसर (परशा) या अभिनेत्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन पिंपरीमधील माजी नगरसेवकाच्या मुलाने नगरमधील महिलेशी मैत्री करुन तिचे ५ तोळ्यांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. शिवदर्शन ऊर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय २५, रा. मोहननगर, आर्केड सोसायटी, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चव्हाण याने वर्षभरापूर्वी फेसबुकवर ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले होते. त्याने आणखीही काही जणींची फसवणुक केली असल्याचा संशय आहे.
चव्हाण याने बनावट अकाऊंट तयार करुन या महिलेला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर दोघांचे फेसबुकवर चाटिंग सुरु झाले. पुढे चाटिंगचे मैत्रीत रुपांतर झाले. सैराटमधील परशा आपला मित्र झालाय, या अविर्भावात नगरची ही महिला वावरु लागली. त्याच्याबरोबर गप्पा मारु लागली. डिसेंबर महिन्यात या चव्हाणने आपल्या आईला पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून पैशाची गरज असल्याचे सांगितले. या महिलेने आपल्याकडे पैसे नाहीत, पण दागिने आहेत. हे घेऊन तू आईवर उपचार कर, असे सांगितले. त्यावर चव्हाण याने मी आईला सोडून येऊ शकत नाही. मित्राला पाठवितो, असे या महिलेला सांगितले. त्यानंतर मित्र म्हणून तो स्वत:च गेला. त्याने या महिलेकडून ५ तोळ्याचे दागिने घेतले. दागिने मिळाल्यानंतर त्याने या महिलेला फेसबुकवरुन ब्लॉक करुन टाकले. त्यानंतर या महिलेला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. तिने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याचा तांत्रिक तपास करुन पोलिसांनी पुण्यातून शिवदर्शन चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून या महिलेचे दागिनेही हस्तगत केले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.