पिंपरीतील एचबी ब्लॉक परिसरात रस्ते काँक्रीटीकरणाचा शुभारंभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG_7158.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
कोरोना बाधित रूग्ण संख्या कमी होत आहे ही दिलासादायक गोष्ट असली तरी सणासुदीच्या काळात बाजारपेठांसारख्या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी या आजाराच्या संक्रमणास कारणीभूत ठरु शकते. म्हणून नागरिकांनी गर्दी करणे टाळून मास्कचा, सॅनिटायझरचा वापर, व्यक्तींमधील सुरक्षित अंतरभान आदी कोरोना संबंधित सुचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापौर
उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विकास कामांमुळे नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे विकासकामे सुरु असताना रहदारीसाठी होणा-या तात्पुरत्या अडचणींवेळी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे असेही त्या म्हणाल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २१, मधील पिंपरीच्या एच बी ब्लॉक परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या. पिंपरीच्या एच बी ब्लॉक परिसरातील १६८० मीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी सुमारे ८ कोटी ३० लाख इतका खर्च केला जाणार आहे. या कार्यक्रमास नगरसदस्य डब्बू आसवानी, संदीप वाघेरे, नगरसदस्या उषा वाघेरे, निकीता कदम, उपअभियंता विनय ओहोळ, अनुश्री कुंभार, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, जी. डी. राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते अमित कुदळे, शारदा मुंढे, प्रविण कुदळे, चंद्रशेखर आहिरराव, जयेश चौधरी, दिनेश मुळचंदानी, श्रीकांत वाघेरे, संतोष वाघेरे, अण्णा कापसे, चंद्रकांत गव्हाणे, अक्षय कदम, रवी धावडे, सुरेश परदेशी, जनक शेठ, राजेश निरानी, एटी मंधन, विकी कुमार आदी उपस्थित होते.
शहरात विकास कामे होत असताना त्या भागातील नागरिकांना त्याचा फायदा होत असतो. भविष्याचा विचार करून विकास कामांचा दर्जा उत्तम राहील याची काळजी महापालिका प्रशासनाने घ्यावी अशी सूचना महापौर ढोरे यांनी केली. कोरोना संक्रमण काळात शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालखंडात नागरिकांनी चांगले सहकार्य केले, त्यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी ठेऊ शकलो. सध्या सणासुदीचा काळ आहे. या काळात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. साधेपणाने सण साजरा करावा. नियमांचे काळजीपूर्वक पालन करून कोरोना सारख्या महामारीला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी महापौरांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक संदीप वाघेरे यांनी तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. आभार नगरसेविका उषा वाघेरे यांनी केले.