पालिकेच्या बौध्दीक दिवाळखोरीचे दर्शन, चक्क पिंपळे सौदागरमध्ये रस्त्याची झाली ‘घरसगुंडी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190708-WA0000-2.jpg)
- आयुक्तांचे आदेश डावलून केली जातेय खोदाई
- विश्वशांती कॉलनीतील रस्त्याची बिकट अवस्था
- संदीप काटे यांनी केली रस्ता दुरूस्तीची मागणी
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॉलनीतील सहा मीटरच्या रस्त्यात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदाई केली. ड्रेनेज लाईन भूमिगत केल्यानंतर महापालिकेच्या कर्मचा-यांनी ड्रेनेज लाईनचे सपाटीकरण व्यवस्थीत केले नाही. आता पावसाने रस्त्याची अक्षरशः घसरगुंडी तयार झाली आहे. कॉलनीतील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन कॉलनीतील रस्ता तातडीने दुरूस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ड्रेनेज लाईन नवीन टाकण्यासाठी अख्या पिंपरी-चिंचवडमधील सर्वच प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन भूमीगत केली आहे. तर, काही प्रभागांमध्ये हे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम काढल्याने महापालिका प्रशासनाच्या बौध्दीक दिवळखोरीचे दर्शन झाले आहे. गेली चार दिवस शहरात संततधार सुरू आहे. ज्याठिकाणी अर्धवट ड्रेनेज लाईन खोदली आहे. त्यात पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीत समाविष्ट झालेल्या पिंपळे सौदागर भागात भयानक परिस्थितीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पिंपळे सौदागर भागातील विश्वशांती कॉलनीत जाणा-या रस्त्यात ड्रेनेज लाईन भूमिगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेल्या रस्त्याचे सपाटीकरण करणे संबंधित ठेकेदाराला बंधनकारक आहे. तरी, हे काम व्यवस्थितरित्या पूर्ण केले नाही. त्यामुळे कॉलनीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कॉलनीत राहणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पायी चालत जाणारा नागरिक घसरून पडेल, अशी रस्त्याची अवस्था झाली आहे. तरी, महापालिका प्रशासनाने कॉलनीतील रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी संदीप काटे यांनी केली आहे.
पावसाळ्यात महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिका-यांनी शहराच्या कोणत्याही भागामध्ये खोदकाम करू नये, असे सक्त आदेश महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी अधिका-यांना दिले आहेत. तरी, पावसाळ्यात ड्रेनेज लाईन भूमीगत करण्याचे काम काढले जात आहे. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केल्यानंतर खोदलेल्या भागाचे व्यवस्थित सपाटीकरण केले नाही. परिणामी, खड्डे तयार होऊन त्यात पाणी साचल्याने रस्त्याची घसरगुंडी तयार झाली आहे. विश्वशांती कॉलनीतून पायी जाणा-या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना पडण्याची भिती निर्माण झाली आहे.
- संदीप काटे, सामाजिक कार्यकर्ते