पालकमंत्र्यांना निमंत्रण दिलं, तरीही घर सोडतीचा कार्यक्रम केला रद्द – महापाैर माई ढोरे
![पालकमंत्र्यांना निमंत्रण दिलं, तरीही घर सोडतीचा कार्यक्रम केला रद्द - महापाैर माई ढोरे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/20210111_170636-scaled.jpg)
उपेक्षित, वंचित, कामगार, घरेलू महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आशेवर पाणी फिरवलं
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड शहरातील उपेक्षित, वंचित, कामगार, घरेलू महिलांसह सर्वसामान्य कुटूंबाना हक्काचं घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविली. त्यातील साडेतीन हजार घरांची सोडत आम्ही काढून त्या लोकांना पात्र करणार होतो. त्याकरिता पालकमंत्र्यांना निमंत्रण दिलं होते. मात्र, महापालिकेचे आयुक्त, प्रशासनाकडून कार्यक्रमास गैरहजर राहत राजशिष्टाचारांचा मुद्दा उपस्थित करुन कार्यक्रम रद्द केला. त्यामुळे घरांचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीने सर्वसामान्य कुटूंबावर अन्याय केल्याने त्याचा मी निषेध करते, असे महापाैर माई ढोरे यांनी टिका केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार होती. त्याकरिता दुपारपासून अर्ज दाखल केलेले नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. या कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, स्थायी सभापती संतोष लोंढे यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
परंतू, या कार्यक्रमास महापालिका आयुक्तासह प्रशासनाकडून कोणीही उपस्थित नव्हते. त्यांनी राजशिष्टाचारा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ऐनवेळी सोडतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर महापालिकेत आयुक्ताच्या कार्यालयासमोर महापाैरासह भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/20210111_163956-1024x576.jpg)
यावेळी भाजप पदाधिका-यांकडून राष्ट्रवादीपुढे झुकणा-या आयुक्तांचा धिक्कार असो’, ‘आयुक्त साहेब माफी मागा, माफी मागा, महापाैरांची माफी मागा, गोरगरीब नागरिकांना त्रास देणा-या राष्ट्रवादीचा धिक्कार असो, अशा राष्ट्रवादीसह आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेतून गोरगरीब नागरिकांना घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्तेत तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावेळी कधीही राष्ट्रशिष्टाचाराचे पालन केलं होतं का? अशी आठवण करुन दिली. तरीही आम्ही पालकमंत्री अजित पवारांना निमंत्रण देवून राजशिष्टाचाराचे पालन करुनच कार्यक्रम घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीला शहरातील गोरगरीबांना घरे मिळू द्यायची नाहीत. त्याना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. सोडतीचा कार्यक्रम झाला तर आम्हाला श्रेय मिळणार नाही. म्हणून पालकमंत्री, मुख्य सचिवानी आयुक्तांना फोन करुन पंतप्रधान आवास योजनेतील सोडतीचा कार्यक्रम रद्द करायला भाग पाडले. त्या सर्वांचा मी धिक्कार करतो, लवकरच विशेष महासभेचे आयोजन करुन सभागृहात सर्व भांडा फोड करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
पक्षनेते नामदेव ढाके यांनीही पंतप्रधान आवास योजनेतील सोडतीचा कार्यक्रम राजशिष्टाचाराचे निमित्त पुढे करुन रद्द केला. त्या राष्ट्रवादी काॅंग्रेस निषेध नोंदवून आयुक्तांना खडेबोल सुनावले.