पार्थ पवारांची पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात ‘यश’स्वी वाटचाल!
![Parth Pawar's 'success' in Pimpri-Chinchwad politics!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Ajit-Pawar-Parth-Pawar-Yash-Sane.jpg)
राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या शहराध्यक्षपदी यश साने यांची निवड
पक्षाच्या स्थानिक निर्णय प्रक्रियेत पार्थ पवारच ‘डिसिजन मेकर’
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक निर्णयांमध्ये युवा नेते पार्थ पवार यांनी ‘यश’स्वी वाटचाल सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ताकाका साने यांचे सुपूत्र यश साने यांची विद्यार्थी आघाडीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे, महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ आणि आता विद्यार्थी शहराध्यक्षपदी यश साने यांना संधी देत पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर पार्थ पवार हेच ‘डिसिझन मेकर’ आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यश साने यांना नियुक्तीचे पत्र दिले. दत्ता काका साने यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसार्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवा नेते पार्थ पवार यांनी साने कुटुंबियांचे घरी सांत्वन केले होते.
शहरातील नवोदितांना पक्षसंघटनेत संधी…
पक्षाच्या शहर संघटनेमध्ये आलेली मरगळ झटकण्यात येईल. नवोदितांना संधी देण्यात येईल, असे सूतोवाच स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमात केले होते. अवघ्या १५ दिवसांमध्ये यश साने यांना विद्यार्थी सेलच्या शहराध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेत नवोदितांना संधी देण्यात येईल, असे संकेत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत.
दत्ताकाकांसारखे काम करुन दाखवेन…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मला काम करण्याची संधी दिली. याबाबत मी सर्वांचे आभार मानतो. पक्षाचे जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे. तो सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. स्व. दत्ताकाका साने यांच्याप्रमाणे काम करुन दाखवेन, असा विश्वास विद्यार्थी आघाडीचे नवनियुक्त शहराध्यक्ष यश साने यांनी व्यक्त केला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Yash-Sane-Jayant-Patil.jpg)