पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी नद्या घेणार मोकळा ‘श्वास’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/pcmc-2.jpg)
- अतिक्रमणे, राडारोडा भराव हटवण्यासाठी अधिका-यांच्या नेमणूका
- हरित लवादाकडे कारवाईचा कालबध्द कृति आराखडा सादर
विकास शिंदे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी |
पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, मुळा व इंद्रायणी नदी काठावरील राडारोडा भराव, इतर अतिक्रमण हटवण्यासाठी कालबध्द कृति आराखडा तयार हरित लवादाकडे सादर केला आहे. येत्या पंधरा दिवसात सर्व अतिक्रमणे व राडारोडा काढण्यास प्रारंभ केला जाईल. त्याकरिता पालिकेच्या अधिका-यांची नियुक्ती, त्याचे क्षेत्र व कामकाज नेमून देण्यात आले आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर एका महिन्यात ही कारवाई पुर्ण करण्यात येईल, अन्यथा संबंधित अधिका-यांवर कामात हयगय केल्यानंतर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नदी काठांवरील अतिक्रमणे व राडारोडा भराव काढल्यास नद्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणे हटविण्यात यावीत. त्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करावा, असे हरित लवादाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यानंतर कारवाईचा कालबध्द कृति आराखडा तयार केलेला आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. शहर विस्ताराबरोबरच नदीच्या वहन क्षमेतवरही विविध घटकांचा मोठा परिणाम दिसून येत आहे. नदीपात्रातील निळ्या आणि लाल पूररेषेमध्ये झालेली बांधकामे, निरनिराळ्या प्रकारची अतिक्रमणे, नदीपात्रात राजरोस टाकण्यात येत असलेला राडारोडा, मैलामिश्रित सांडपाणी मिसळल्यामुळे नदीच्या वहनक्षमतेवर अडथळा ठरत आहेत. याशिवाय नदी मृत अवस्थेत जाऊन श्वास कोंडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी आणि स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने आवाज उठविला आहे. काहींनी थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. याकडे हरित लवादाने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्याची दखल घेऊन न्यायाधिकरणाने महापालिकेला, जलसंपदा विभागाला खडे बोल सुनावले आहेत. आदेशानंतर केवळ कागदोपत्री दिखाऊ उपाययोजना दाखवून नदीसंवर्धनासाठी प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना होत नाही, याबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संततधार पावसामुळे या नद्यांवरील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाला. याशिवाय शहरात पूरपरिस्थितीही निर्माण झाली. यावर पिंपरी चिंचवड महापालिकेने कालबध्द कृति आराखडा तयार करुन लवादाकडे सादर केला. त्यात पवना, मुळा व इंद्रायणी नदी काठावरील राडारोडा भराव, इतर अतिक्रमणे काढण्यास अधिका-यांना क्षेत्र व कामकाज नेमून दिले आहे.
दरम्यान, हरित लवादाकडे पालिकेने सादर केलेल्या कृति आराखड्यांची तत्काळ अमंलबजावणी करण्यात येईल. शहर अभियंता यांनी पालिकेच्या अधिका-यांना नेमून दिलेल्या कामकाजासह सहशहर अभियंता, ड्रेनेज पर्यावरण यांनी पाटबंधारे, जिल्हाधिकारी, पोलिस विभागाशी समन्वय साधून अमंलबजावणी करण्यात येईल. तसेच सदरील राडारोडा हा मोशीच्या बंद खाणीमध्ये खाण विभागाच्या मंजूरीने टाकण्यात यावा, असेही आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आदेशात म्हटले आहे.
अधिकारी व क्षेत्र-कामकाज
सतीश इंगळे – पवना, मुळा नदी ( पिंपळे सैदागर, पिंपळे निलख, काळेवाडी, पिंपळे गुरव, रावेत, किवळे, मामुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, कासारवाडी, दापोडी, फुगेवारी), राजेंद्र राणे – मुळा, इंद्रायणी नदी ( मोशी, बो-हाडेवाडी, चिखली, च-होली, तळवडे, बोपखेल), शिरीष पोरेड्डी – पवना नदी ( रहाटणी, पिंपरीगाव, थेरगाव)
कारवाईचा अहवाल…
तिन्ही नद्या काठ सीमारेषांचा पाटबंधारे अधिका-यासमवेत संयुक्त सर्व्हे करणे,
अनधिकृत बांधकामे, राडारोडा व भराव टाकणारे, नकाशानूसार मोजमापासह यादी तयार करणे
सर्वांना एमआरटीपी अक्टनुसार कायदेशीर नोटीस बजावणे, बांधकामे-भराव काढून न घेतल्यास कारवाई करणे अथवा रितसर एफआयआर दाखल करणे
नदीपात्र व सीमारेषांतील जागा मालकांची नावे, 7/12 त्यांची त्या क्षेत्रातील माहिती उपलब्ध करणे
कारवाईनंतर देखरेख पथक तयार करुन त्यावर नियंत्रण ठेवणे
मैलापाणी व सांडपाणी सर्व्हे करुन नजीकच्या पंपींग स्टेशनकडे वळविणे
घनकचरा, सांडपाणी रोखणे व प्रदूषण कमी करणेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे