पवनाथडीचे थाटात उद्घाटन, प्रेक्षकांनी घेतला सांस्कृतीक कार्यक्रमाचा आनंद
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे नवी सांगवी येथे भरविण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पाच वाजता झाले. यावेळी प्रमुख आकर्षण ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर या होत्या.
पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ तयार करून देण्यासाठी महापालिकेने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविली आहे. 4 ते 8 मार्च दरम्यान पवनाथडी सुरू राहणार आहे. त्यामध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, माजी नगरसेवक राजू दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.
सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी आनंद घेतला. उद्या 5 मार्च रोजी ऐतिहासिक स्त्रीपर्व कार्यक्रम, लक्ष्मण रेषा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच, 6 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ”यदा कदाचित” हा तुफान विनोदी नाटक सादर होणार आहे. 7 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ”मधुरा रेसिपी” संवाद कार्यक्रम आणि सात वाजता ”लोकगीतांची बरसात” हे कार्यक्रम होणार आहेत. 8 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ”खेळ पैठणीचा” आणि सात वाजता ”लावण्यसुंदरी” हा लावण्या सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पवनाथडीची सांगता होणार आहे.