Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फोटोवाल्या खासदाराचा प्रसिद्धीसाठी गल्लीत बैठकांवर जोर; आमदार जगतापांचा पलटवार

  • थेरगाव अतिक्रमण कारवाईचे धोरण ठरविण्याचे आवाहन
  • खासदार बारणे यांच्याकडून त्याचे राजकीय भांडवल

 

पिंपरी  शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरूवात करण्याचे आवाहन केले होते. आम्ही चांगल्या कामासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी  खासदार बारणे यांनी चांगल्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची पुरेपूर संधी साधली आहे. महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय पात्रता असलेल्या बारणे यांना दिल्लीपेक्षा गल्लीतच जास्त रस असल्याचे सिद्ध होत आहे, असा पलटवार भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार बारणे यांच्यावर केला आहे.

 

शहरातील विकास कामांच्या मुद्यांवरून खासदार बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार जगताप यांच्यावर टिका केली होती. त्यातून जगताप आणि बारणे यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहराच्या विकासाचे गोडवे गाणारे खासदार बारणे यांच्यामुळे थेरगावचा विकास होऊ शकला नाही, अशी टिका करत आमदार जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यावर विकासाच्या मुद्यावर बोलल्यानंतर जगताप यांचा राग अनावर का झाला?, असा प्रश्न बारणे यांनी काल प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला. त्याला आमदार जगताप यांनी आज मंगळवारी (दि. 28) शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

 

आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पिंपरी-चिंचवडमधील रस्ते मोठे आणि प्रशस्त आहेत. तरीही शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते, हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन आपल्या स्तरावरून कारवाई करत असते. परंतु, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. तसेच, विकासाची दूरदृष्टी असेल, तर ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव परिसराचा विकास करण्याचे आव्हानही आपण दिले होते. नागरिकांच्या प्रश्नांचा कळवळा असलेले बारणे हे आव्हान स्वीकारून पुढे येत अतिक्रमणांवर कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी आमच्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून प्रसिद्धी मिळवली.

 

खासदार बारणे यांनी दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात “फोटोवाला खासदार” म्हणून राजकीय ओळख प्राप्त केली आहे. पंतप्रधानांपासून ते अनेक केंद्रिय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे जायचे आणि एखादे निवेदन देऊन त्यांच्यासोबत फोटोसेशन करायचे. त्यानंतर त्याची भरपूर प्रसिद्धी मिळवायची आणि प्रत्यक्षात प्रश्न मात्र “जैसे-थे” ठेवायचे, हीच त्यांची राजकीय पद्धत राहिली आहे. मोदी लाटेच्या कृपेमुळे खासदारकीची लॉटरी लागली. त्याचा उपयोग केंद्राशी संबंधित जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना करता आला नाही. ऊठसूठ महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यावरून हे स्पष्ट होते. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या सात-आठ महिन्यांवर आल्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या रेडझोनसह अन्य प्रश्नांवर लोकांना काय उत्तर द्यायचे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे दिल्लीतल्या नेत्यांसोबत फोटोसेशन केल्यानंतर आता गल्लीतील गोष्टींवरून ते प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी धडपडत आहेत, असा आरोप जगताप यांनी केला आहे.

 

फोटोवाला खासदार हवा की प्रश्न सोडविणारा – जगताप

महापालिकेत खाबुगिरी असेल, तर चारवेळा नगरसेवक राहिलेल्या खासदार बारणे यांना त्याचे पुरावे द्यायला कोणी अडविले आहे. मोघम आरोप करून आपण खरोखरच “फोटोवाला खासदार” असल्याचे ते स्वतःहून जनतेसमोर सिद्ध करत आहेत. बारणे यांना ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव भागातून महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणता आले आहेत. खासदार झाल्यानंतर त्यांनी केवढी मोठी राजकीय उंची गाठली आहे, हे यावरून स्पष्ट होते. याच राजकीय कतृत्वाच्या जोरावर आपण २०१९ ला पुन्हा खासदार होण्याची वल्गना त्यांनी जरूर करावी. परंतु, “फोटोवाला खासदार” हवा की दिल्लीतील प्रश्न सोडवणारा खासदार हवा, हे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेला आता चांगलेच कळून चुकले आहे, अशी बोचरी टिकाही जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button