पदवीधर, शिक्षक मतदारांना नावनोंदणीची संधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Graduate-Constituency_1509021254212.jpg)
पुणे |महाईन्यूज|
‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठीच्या नावनोंदणीसाठी सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत असली, तरी ३० नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतरही संबंधित मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. या मतदारसंघांच्या निवडणुका जुलै २०२० मध्ये होणार असल्याने एक जानेवारी २०२० पासून ते उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत मतदारांना अर्ज करता येणार आहेत,’ असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
या मतदारसंघांसाठी मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी काही संस्था आणि संघटनांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘मतदारांना सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामध्ये बदल करता येणार नाही. मात्र, ३० नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना अर्ज करता येणार आहेत. या मतदारसंघांच्या निवडणुका येत्या जुलै महिन्यात होणार आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या दिवसापूर्वी दहा दिवस अगोदरपर्यंत मतदारांना मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करता येतो. त्यामुळे सहा नोव्हेंबरपर्यंत अर्ज न केलेल्या मतदारांना एक जानेवारीनंतर अर्ज करता येणार आहेत.’