नेहरुनगरमध्ये होर्डिंग्ज दिसावे म्हणून झाडाची केलीय कत्तल, उद्यान विभागाचे दुर्लक्ष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/20190518_172810.jpg)
- अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई कधी ?
पिंपरी ( महा ई न्यूज ) – वृक्ष संवर्धनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका लाखो रुपये खर्च करते, झाडे लावा – झाडे जगवा असा संदेश देवून जनजागृतीही करण्यात येते. परंतू, नेहरुनगर येथील संतोषीमाता चाैकात उभारलेले होर्डिंग्ज ये-जा करणा-या सर्वांना दिसावे, त्या जाहिरात फलकास झाडाची अडचण येवू नये, याकरिता सिग्नल शेजारील पिंपळाच्या झाडाची कत्तल करण्यात आलीय, याकडे महापालिका उद्यान विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्या झाडाची कत्तल करणा-यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नेहरुनगर येथील संतोषीमाता चाैकात सिग्नल शेजारीच पिंपळे झाड होते. हे झाड आठ ते दहा वर्षांचे फारच जुने होते. असह्य उन्हाळ्यात त्या झाडाच्या सावलीने अनेकांना दिलासा मिळत होता. त्या झाडाचा कोणालाही त्रास नव्हता. परंतू, त्या झाडा शेजारीच एका जाहिरात व्यावसायिक ठेकेदाराने होर्डिंग्ज उभे केले आहे. ते होर्डिग्ज अनधिकृतपणे उभारल्याचे अनेकजण बोलत आहे. हे होर्डिंग्ज स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने उभारल्याची देखील चर्चा आहे. हे होर्डिंग्ज उभारल्यानंतर त्यावरील जाहिराती ये-जा करणा-या नागरिकासह ग्राहकांना दिसत नव्हत्या. त्या होर्डिंग्जवरील जाहिरातींना हे झाड अडकाठी बनले होते.
दरम्यान, नेहरुनगर येथील सिग्नल शेजारील पिंपळाच्या झाडाची कत्तल करण्यात आली आहे. त्या झाडाच्या सगळ्या फांद्याची छाटणी केल्याने ज्येष्ठ नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे त्या झाडाची छाटणी करणा-यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.