Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
…. पण बिल्डरधार्जिण शिवसेना नेत्यांचा एवढा तिळपापड का ? तुषार कामठेंचा सवाल
पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील नवीन इमारतीतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, लाखो रुपये देऊन फ्लॅट विकत घेणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना समान पाणी मिळावे, याकरिता बांधकाम परवानगी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे पाणी प्रश्न मिटेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बांधकाम परवानगी न देण्याच्या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होतेय, परंतू बिल्डरधार्जिण्या शिवसेना नेत्यांना हा निर्णय अयोग्य वाटत आहे. कारण, बांधकाम परवानगीसाठी कोण, कोणत्या बिल्डरांची फाईल महापालिकेकडे दाखल आहे. त्यामध्ये कोण-कोण भागीदार आहे, याबाबत पडताळणी करून घेतल्यास या निर्णयाचा नेमका फायदा कोणाला ? होईल, हे सर्व संपुर्ण शहराला कळेल, असा आरोप नगरसेवक तुषार कामठे यांनी शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांचे नाव न घेता केला आहे.
तुषार कामठे यांनी दिलेल्या प्रसिध्द पत्रकांत म्हटले आहे की, वाकड-पिंपळेनिलखच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपकडून होत असलेल्या विकासकामांमुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा तिळपापड झाला आहे. भविष्यात राजकीय वाटचाल अडचणीची ठरतील म्हणून शिवसेनेकडून आरोपांचे राजकारण केले जात आहे. तसेच वाकड परिसराला दररोज ९ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. या भागातील छोट्या-मोठ्या ७०० सोसायट्या आहेत. त्यामध्ये सुमारे १६ हजार फ्लॅट आहेत. त्या घरातील नागरिकांना दररोज १० एमएलडी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, वाकडमधील बैठी घरे, गावठाण, झोपडपट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा विचार केल्यास १० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याचे गरज आहे.
महापालिकेने २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात वाकड भागातील १५१ नवीन बांधकामांना परवानगी दिली. अद्याप 57 प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यानुसार नवीन बांधकामानूसार ३ हजारहून अधिक फ्लॅट तयार झाल्यास तेथील नागरिकांना किमान २ एमएलडी पाणी द्यावे लागेल. मात्र, आताच नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना समान पाणी मिळावे, यासाठी हा निर्णय आवश्यक आहे. दरम्यान, महापालिकेला महसूल मिळावा, याकरिता मी सहमत आहे. परंतू, चिंचवड विधानसभा मतदार संघात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यानंतर नवीन बांधकामांना पुन्हा परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयावरून राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी नागरिकांची दिशाभूल करु नये, असेही त्यांनी म्हटले आहे.