नागपूरचा पोपट काय म्हणतोय, दरवाढ कमी नाय म्हणतोय; राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/PHOTO-01.jpg)
पिंपरी – पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करण्याचे फसवे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षात रोज नागरिकांवर अन्यायकारक भाववाढ लादली. त्याचा परिणाम म्हणून दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एसटीची अठरा टक्के भाववाढ जाहिर करुन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नागरिकांना अच्छे दिनची भेट दिली असल्याची उपरोधीक टिका करत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने वल्लभनगर आगारामध्ये भाजप सरकारचा निषेध केला.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 18) पिंपरीतील वल्लभनगर एसटी स्थानकात एसटीच्या भाववाढ विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता दत्ता काका साने, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, शहर प्रवक्ता फझल शेख, शहर संघटिका कविता खराडे, शिक्षण मंडळाच्या माजी उपाध्यक्षा लता ओव्हाळ, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, शहर उपाध्यक्षा शिल्पा बिडकर, संगीता जाधव, रुपाली गायकवाड, विना मोहिते, सविता धुमाळ, संयोजिता दोडके, शमा कोरवू, देवी थोरात, मिना कोरडे, जयश्री पाटील, सुरेखा जगदाळे, अनिता खंडागळे, रंजना कातळकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी एसटी भाववाढ केल्याच्या विरोधात ‘वारे सरकार तेरा झोल, सस्ती दारु महेंगा पेट्रोल…’, नागपूरचा पोपट काय म्हणतोय, दरवाढ कमी नाय म्हतोय… अशा घोषणा देऊन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.